
लातूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।
जिल्ह्यात अतिशय कमी पाऊस झाल्याने सर्वच सिंचन प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. यामुळे प्रकल्पांमधील गाळ उघडा झाला असून या गाळाचा उपसा झाल्यास प्रकल्पाच्या साठवण क्षमतेत वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या प्रकल्पांमधून स्वखर्चाने हा गाळ घेवून जावा. यासाठी जलसंपदा विभागाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या गुगल फॉर्ममध्ये माहिती भरून आवश्यक परवानगी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे.
यावर्षी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक जलसाठे पूर्णतः कोरडे पडले असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जलसाठ्यांची साठवण क्षमता वाढवण्यासाठी आणि भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी या जलसाठ्यांमधील गाळ स्वखर्चाने घेवून जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गाळ काढण्यासाठी व तो वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेला अर्ज सहज उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळासह जलसंपदा विभागाने ऑनलाईन स्वरुपात गुगल फॉर्मद्वारे उपलब्ध करून दिला आहे. तरी सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी हा अर्ज भरून जलसाठ्यांमधील गाळ काढून जलक्षमता वाढवण्याच्या या उपक्रमात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच पाण्याची बचत ही काळाची गरज असून सर्वांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis