
नवी दिल्ली, १८ ऑक्टोबर (हिं.स.). भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचे मत आहे की, संघ व्यवस्थापन हार्दिक पांड्याच्या जागी नवीन क्रिकेटपटू शोधण्यावर जास्त लक्ष केंद्रित करत आहे, तर त्याच्यासारख्या क्षमतेच्या क्रिकेटपटूची जागा घेणे अशक्य आहे. ते म्हणाले की, जर हार्दिकच्या क्षमतेचा क्रिकेटपटू सापडला नाही, तर संघाने वेगळ्या भूमिकेसाठी दुसऱ्या क्रिकेटपटूला तयार केले पाहिजे.गावस्कर यांनी वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-२० मालिकेतून मिळालेले धडे, नमन धीरची फलंदाजी आणि भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजीच्या संयोजनावरही आपले विचार मांडले.
बंगळूरूमधील भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा आणि निर्णायक टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. केवळ ७.४ षटके खेळली गेली, ज्यामुळे मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली.
गावस्कर म्हणाले, आम्हाला गोलंदाजी पाहण्याची संधी मिळाली नाही. या नऊ षटकांच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कशी कामगिरी केली हे पाहणे मनोरंजक ठरले असते. या मालिकेतून एक धडा मिळतो की भारताने किमान चार नियमित गोलंदाज मैदानात उतरवले पाहिजेत. पाचव्या आणि सहाव्या गोलंदाजाची भूमिका फलंदाजीही करू शकणारे अष्टपैलू क्रिकेटपटू बजावू शकतात.
ते पुढे म्हणाले, नमन धीरसारखे क्रिकेटपटू फलंदाजीत अधिक सक्षम आहेत, पण ते दोन-तीन षटके गोलंदाजीही करू शकतात. अक्षर पटेल आपली चार षटके पूर्ण करू शकतो. कधीकधी आपण हार्दिक पांड्याच्या जागी पर्याय शोधण्यावर जास्त लक्ष केंद्रित करतो. हार्दिक पांड्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. जर त्याच्या क्षमतेचा क्रिकेटपटू उपलब्ध नसेल, तर आपण अशा क्रिकेटपटूचा विचार केला पाहिजे जो थोडी वेगळी भूमिका बजावू शकेल. नमन धीर नेमके तेच करत आहे. तो आपली षटके चांगली टाकत आहे आणि या सामन्यात त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली तीही उत्कृष्ट होती.
गावस्कर म्हणाले की, आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करू शकणाऱ्या क्रिकेटपटूंना संघात घेऊन गोलंदाजी कमकुवत करू नये. तो म्हणाला, जेव्हा तुम्ही आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करत राहण्यासाठी तुमच्या गोलंदाजीशी तडजोड करता, तेव्हा संघ कमकुवत होतो आणि यामुळे पराभव होऊ शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे