
ढाका, 18 ऑक्टोबर (हिं.स.)नाहिदा अख्तरची बांगलादेश टी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाहिदा आता निगार सुलताना यांची जागा घेणार असून, शोभना मोस्तारी यांची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आशियाई खेळांनंतर आपल्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी निगार सुलताना यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या जागी नवीन कर्णधार म्हणून नाहिदा अख्तरचे नाव आघाडीवर होते.
बीसीबी (BCB) महिला विभागाचे अध्यक्ष रफिकुल इस्लाम यांनी सांगितले, आम्ही निवड समितीच्या सदस्यांशी आणि इतरांशी चर्चा करून टी-२० आंतरराष्ट्रीय संघाचे कर्णधारपद नाहिदाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. शोभना मोस्तारी तिची उपकर्णधार असेल.
रफिकुल यांच्या मते, नाहिदाकडे सूत्रे सोपवण्यासाठी हीच योग्य वेळ होती. २०२२ मध्ये जेव्हा सुलताना यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते, तेव्हापासून नाहिदा संघाची उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळत होती.
रफिकुल म्हणाले, नाहिदा बऱ्याच काळापासून उपकर्णधार म्हणून काम करत आहे. आता तिला टी-२० आंतरराष्ट्रीय संघाची जबाबदारी देण्याची योग्य वेळ आली आहे असे आम्हाला वाटते.
सुलतानाने टी-२० आंतरराष्ट्रीय कर्णधारपद सोडले असले, तरी ती एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणे सुरूच ठेवणार आहे. जसे तिने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत केले होते. सुलतानाच्या या निर्णयामुळे बीसीबीला धक्का बसला. मात्र, असे समजते की, अलीकडच्या काळात बोर्डाकडून मिळालेल्या वागणुकीमुळे ही यष्टिरक्षक-फलंदाज नाराज होती.
बांगलादेशचा पुढील दौरा थायलंडमध्ये होणाऱ्या 'आयसीसी महिला इमर्जिंग नेशन्स ट्रॉफी'साठी आहे. या स्पर्धेत त्यांचा पहिला सामना १२ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे