
* टायगरचा चालक आणि रिक्षा चालक जखमी
* मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे निर्देश
मुंबई, १८ ऑक्टोबर (हिं.स.) : जुहू पोलीस ठाण्याच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये टायगर श्रॉफ बचावला असला तरी त्याचा ड्रायव्हर मात्र गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल सात राऊंड फायर केल्यानंतर दुचाकीवरून आरोपी फरार झाले. दरम्यान बिश्नोई गँगने या गोळीबाराची जबाबदारी स्विकारली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुहू पोलीस ठाण्याच्या 100 मीटर अंतरावर हा गोळीबार झाला. या गोळीबारानंतर आता रस्ता बंद करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त मोहित गर्ग यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी गोळीबार झाला तिथून 300 मीटर अंतरावरती रोहित शेट्टी यांच्याच घरावरती गोळीबार झाला होता. दरम्यान, टायगरच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर बिश्नोई गँगने या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. या संदर्भातील एक ऑडिओ व्हायरल झाला असून या संदर्भात जर सलमान खानसोबत काम केल्यास प्रत्येकाचे हाल असाच होईल, अशी धमकी सुद्धा दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
पोलिसांनी माहिती दिली आहे की, टायगर श्रॉफ हा सुरक्षित आहे. जुहूतील पुष्पा पार्क येथे ही घटना घडली आहे. टायगर त्याठिकाणी फुटबॉल खेळायला गेला होता, त्यावेळी ही घटना घडली आहे. तिन्ही व्यक्ती या दुचाकीवरुन आल्या होत्या त्यांनी अचानकपणे गोळीबार सुरु केला. पण सुदैवाने या गोळीबारामध्ये अभिनेता टायगर श्रॉफ हा थोडक्यात बचावला आहे. यावेळी टायगरसोबत त्याचा चालक होता. त्याशिवाय याठिकाणी एक रिक्षाचालकही होता, अशी सुरुवातीला माहिती समोर आली होती. पण आता टायगर सुरक्षित असल्याची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडतेय हे खूप दुर्दैवी - आ. झिशान सिद्दीकी
गृहमंत्र्यांनी या प्रकरणाकडे लक्ष दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांनी दिली आहे. आम्हाला दोन वर्षांत अजून न्याय मिळालेला नाही. माझ्या वडिलांच्या निधनाला दोन वर्षे झाली आहेत आणि मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ज्या प्रकारे बिघडत आहे, ते खूप दुर्दैवी आहे. मला नुकतेच कळले की टायगर श्रॉफवर गोळीबार झाला आणि ही एक अत्यंत चुकीची गोष्ट आहे. पूर्वी, जेव्हा माझा जन्मही झाला नव्हता, तेव्हा आम्ही मुंबई किती असुरक्षित होत आहे याबद्दल ऐकायचो. मी माझ्या सुरक्षेची मागणी करत आहे, पण माझी सुरक्षा एक टक्काही वाढलेली नाही. त्यामुळे, ही एक मोठी चिंतेची बाब आहे. मला वाटते की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी या प्रकरणाकडे लक्ष दिले पाहिजे आणि आपण पोलीस अधिकारी व गुप्तचर यंत्रणेची निश्चितपणे चौकशी केली पाहिजे, कारण मुंबईत असे घडत आहे हे खूप दुर्दैवी आहे.
सरकार गांभीर्याने घेत नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव - खा. सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे धक्कादायक आहे, सातत्याने महाराष्ट्रात क्राईम वाढतोय. म्हणजे हा आरोप नाहीये, हे वास्तव आहे. केंद्र सरकारचा डेटा जो सांगतो, हे डबल इंजिन सरकार आहे. म्हणजे एकाच विचाराचं सरकार महाराष्ट्रात आहे आणि एकाच त्याच विचाराचं केंद्रात आहे. माझी महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे की एकीकडे प्रचंड दुष्काळ महाराष्ट्रात आहे, आत्महत्या वाढतायत, बेरोजगारी खूप मोठी आव्हानं राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत. कुठेतरी लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न हा वाढत चाललाय आणि लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न कधी वाढतात? क्राईम कधी वाढतो? जेव्हा इकॉनॉमिक सिच्युएशन, आर्थिक इशूज जेव्हा वाढतात, तेव्हा या गोष्टी होतात. हे अतिशय चिंताजनक आहे आणि महाराष्ट्र सरकार या विषयाबद्दल गांभीर्याने घेत नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी