दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी बीड तालुक्यातील सरपंच व प्रशासनाने समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी
बीड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील पाणीटंचाई व दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस जिल
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन


बीड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील पाणीटंचाई व दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जितीन रहेमान, जिल्हा परिषद बीडचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. प्रशांत देशपांडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांच्यासह तालुक्यातील सरपंच व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पाणी बचत आणि दुष्काळ निवारणाला प्राधान्य

जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांनी दुष्काळी परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी ग्रामपंचायतींचे सरपंच आणि प्रशासनातील सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने व सतर्क राहून काम करण्याच्या सूचना दिल्या. उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याची नासाडी टाळावी आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत आवश्यक नियोजन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे निर्देश

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासोबतच व्ही. बी. रामजी तसेच मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत जलसंधारणाची कामे हाती घेण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसाचे पाणी साठविणे, भूजलपातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.

सरपंचांच्या समस्या जाणून घेत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद

बैठकीदरम्यान उपस्थित सरपंचांनी आपल्या गावांतील पाणीपुरवठा, पाणीटंचाई आणि इतर विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रशासनाने या समस्या जाणून घेत संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा केली आणि त्यावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी ग्रामपंचायती आणि प्रशासनाने एकत्रितपणे प्रयत्न करावेत, उपलब्ध जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन करावे आणि जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी, हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande