भारताच्या ज्ञानपरंपरेत मानवतेला मार्गदर्शनाची क्षमता : डॉ. मोहन भागवत
मुंबईत ‘ऑल इंडिया विहार सेवा ग्रुप’च्या १४व्या परिषदेत सरसंघचालकांचे प्रतिपादन मुंबई, २ ऑक्टोबर (हिं.स.) : “राष्ट्राचा उद्देश धर्म आहे आणि धर्मच राष्ट्राला टिकवून ठेवतो. धर्म आणि राष्ट्र हे परस्परांवर अवलंबून आहेत. एकाचे अस्तित्व असेल तरच दुसऱ्याच
सरसंघचालक


सरसंघचालक


मुंबईत ‘ऑल इंडिया विहार सेवा ग्रुप’च्या १४व्या परिषदेत सरसंघचालकांचे प्रतिपादन

मुंबई, २ ऑक्टोबर (हिं.स.) : “राष्ट्राचा उद्देश धर्म आहे आणि धर्मच राष्ट्राला टिकवून ठेवतो. धर्म आणि राष्ट्र हे परस्परांवर अवलंबून आहेत. एकाचे अस्तित्व असेल तरच दुसऱ्याचे अस्तित्व टिकू शकते,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

मुंबईतील बोरीवली येथे २ ऑक्टोबर रोजी आयोजित ‘ऑल इंडिया विहार सेवा ग्रुप’च्या १४व्या परिषदेत ते जैन तरुणांसह उपस्थितांना संबोधित करत होते. यावेळी पद्मभूषण परमपूज्य आचार्य श्रीमद् विजय रत्नसुंदरसूरि महाराज, आचार्य महाबोधी सूरीश्वरजी यांच्यासह विविध आचार्य आणि मान्यवर उपस्थित होते.

जग सध्या विविध विरोधाभास, संघर्ष आणि टोकाच्या विचारसरणींमुळे अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत मानवतेला मार्गदर्शन करण्याची क्षमता भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेत आहे. त्यामुळे जग आज भारताकडे आशेने पाहत आहे, असे डॉ. भागवत यांनी नमूद केले.

भारताने आपल्या ज्ञानाचा प्रसार अन्य देशांवर आक्रमण करून किंवा सक्तीने धर्मपरिवर्तन घडवून केलेला नाही. मानवकल्याणाच्या निःस्वार्थ भावनेतून भारताने आपले ज्ञान जगाला दिले, हीच भारतीय ज्ञानपरंपरेची वैशिष्ट्यपूर्ण ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.

वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत आणि भगवद्गीता यांसह जैन आगम, त्रिपिटक आणि गुरुग्रंथ साहिब यांसारख्या ग्रंथांमध्ये मानवतेला दिशा देणारे व्यापक ज्ञान सामावलेले आहे. संतांच्या शिकवणुकीतूनही मानवकल्याण, समरसता आणि सेवाभावाचा संदेश मिळतो.

या ज्ञानसंपदेची आज संपूर्ण जगाला आवश्यकता असल्याचे डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले.

भारताच्या महान ज्ञानपरंपरेचे संरक्षण करणे आणि ती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही केवळ धार्मिक जबाबदारी नसून संपूर्ण मानवतेप्रती असलेले कर्तव्य आहे. संतपरंपरा आणि सेवाभावी वृत्तीचे जतन करणे म्हणजे मानवी समाजाच्या सुरक्षित व कल्याणकारी भविष्याचे जतन करणे होय, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी विहार सेवक आणि उपस्थितांना संबोधित करताना पद्मभूषण परमपूज्य आचार्य श्रीमद् विजय रत्नसुंदरसूरि महाराज म्हणाले की, देशाची संस्कृती संपली तर देश संपायला वेळ लागत नाही. त्यामुळे देशाची संस्कृती वाचवणे आणि तिचे जतन करणे गरजेचे असून, हे आपल्या संस्कारांमुळेच शक्य होईल. “राष्ट्र वाचले तर धर्म वाचेल आणि धर्म वाचला तर आपण सुरक्षित राहू,” असे त्यांनी सांगितले. राष्ट्रसुरक्षा आणि संस्कृती रक्षणासाठी आपण संघासोबत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

‘ऑल इंडिया विहार सेवा ग्रुप’ देशभरात पायी प्रवास करणाऱ्या जैन साधूंचा प्रवास सुरक्षित आणि अपघातविरहित होण्यासाठी मदत करते. दरम्यान, आचार्य श्रीमद् विजय रत्नसुंदरसूरि महाराज यांनी आतापर्यंत ५०० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या ‘आनंद यात्रा-अठराह कर्तव्य’ या ५३६व्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande