
दीपके संतापले, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले बाजूला
मुंबई, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। मुंबईच्या दादर परिसरातील शिवार्जी पार्क येथे आज, शुक्रवारी कॉक्रोच जनता पार्टीतर्फे (सीजेपी) निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी सीजेपीच्या आंदोलनातील काहींनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे सीजेपीचे कार्यकर्ते संतापले होते. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत घोषणा देणाऱ्यांना बाजुला नेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीकडून शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करण्यात आले. अभिजीत दिपकेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण-तरुणी सहभागी झाले होते. यावेळी काही चित्रपट कलावंतांनीही हजेरी लावली होती.
आंदोलन सुरू असताना काही कार्यकर्ते घटनास्थळी आले आणि त्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या. यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी परिस्थितीचा अंदाज घेत या कार्यकर्त्यांना तातडीने बाजूला केले. घोषणा देणारे हे कार्यकर्ते नेमके कोणत्या राजकीय पक्षाशी किंवा संघटनेशी संबंधित आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या आंदोलनादरम्यान सीजेपी कडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ‘ज्ञानू इट्स डन ब्रो’ अशा घोषणांमधून आंदोलकांनी आपला विरोध व्यक्त केला.ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह एसआयआर प्रक्रियेची सखोल चौकशी करावी आणि 2023 चा निवडणूक आयोग कायदा रद्द करावा, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांकडून करण्यात आल्या. दरम्यान, आंदोलनस्थळी निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी