
बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड जप्त; गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई
नाशिक, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिक शहरात अवैधरीत्या घुसखोरी करून वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. नवनाथनगर, पेठरोड, पंचवटी येथे सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत संशयितांकडून बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड जप्त करण्यात आले.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी पथक नियुक्त केले होते. पोहवा प्रवीण वाघमारे व पोहवा विशाल देवरे यांना गुप्त बातमीदारामार्फत नवनाथनगर येथे बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना माहिती दिल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
रोनी अब्दुल शेख (वय ३२, रा. शिंदे चाळ, नवनाथनगर, पंचवटी) आणि आशिक अलीअकबर अन्सारी (वय २४, रा. प्लॉट क्रमांक ८०, नवनाथनगर, पंचवटी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दोघेही मूळचे मिजबाडी, पोस्ट मुरादपूर, तालुका सोमोहनी, पोलीस ठाणे बेगमगंज, जिल्हा नोवाखाली, बांगलादेश येथील रहिवासी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.त्यांच्याकडे आढळलेली आधारकार्ड व पॅनकार्ड बनावट असल्याचे तपासात स्पष्ट झाले. तसेच भारतात वास्तव्यासाठी आवश्यक वैध कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. भारत-बांगलादेश सीमेवरून सक्षम अधिकाऱ्यांची लेखी परवानगी न घेता अवैध मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकचे पोअं मुख़्तार शेख यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI