नायजेरियातील बोर्नो येथे लष्करी ताफ्यावर हल्ला; १५ जणांचा मृत्यू
अबुजा, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।नायजेरियातील बोर्नो राज्यात लष्करी ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तानुसार, ईशान्येकडील बोर्नो राज्यात एका ताफ्यातील वाहन भूसुरुंगाच्या स्फोटात सापडले आणि त्यानंतर ताफ्यावर गोळीब
नायजेरियातील बोर्नो येथे लष्करी ताफ्यावर हल्ला; १५ जणांचा मृत्यू


अबुजा, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।नायजेरियातील बोर्नो राज्यात लष्करी ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तानुसार, ईशान्येकडील बोर्नो राज्यात एका ताफ्यातील वाहन भूसुरुंगाच्या स्फोटात सापडले आणि त्यानंतर ताफ्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत नायजेरियाचे १० सैनिक आणि ‘सिव्हिलियन जॉइंट टास्क फोर्स’चे पाच सदस्य अशा एकूण १५ जणांचा मृत्यू झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅम्बोरू बटालियनचे सैनिक शनिवारी गॅम्बोरू नगाला आणि शेजारील कॅमेरून देशादरम्यानच्या रस्त्यावर गस्त घालत होते. त्याच वेळी एका पिकअप ट्रकखाली पेरलेल्या भूसुरुंगाचा स्फोट झाला. हा भूसुरुंग बोको हरामच्या दहशतवाद्यांनी पेरल्याचा संशय आहे.

या घटनेवर लष्कराचे प्रवक्ते कॅप्टन मोहम्मद गोनी यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सूत्रांच्या माहितीनुसार, वाहनात असलेल्या आठ सैनिकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी दुसऱ्या वाहनावरही गोळीबार केला. या गोळीबारात आणखी दोन सैनिक आणि ‘सिव्हिलियन जॉइंट टास्क फोर्स’चे पाच सदस्य मारले गेले. ही टास्क फोर्स लष्कराला मदत करते.माध्यमांशी बोलण्याची परवानगी नसल्यामुळे सूत्रांनी आपली ओळख गोपनीय ठेवण्याची विनंती केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात जखमी झालेल्या सहा सैनिकांना उपचारांसाठी मैदुगुरी येथील मैमलारी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले.गेल्याच आठवड्यात बोको हरामच्या संशयित दहशतवाद्यांनी बोर्नो राज्यातील लष्करी तळावर नियोजनबद्ध हल्ला केला होता. या हल्ल्यात किमान १० सैनिकांचा मृत्यू झाला, तर अन्य २० जण जखमी झाले होते.बोर्नो हे बोको हराम आणि त्यातून फुटलेल्या ‘इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रोव्हिन्स’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बंडखोरीचे केंद्र आहे. सातत्याने लष्करी मोहिमा राबवूनही या दोन्ही संघटना नायजेरियाच्या ईशान्य भागात तसेच सीमावर्ती प्रदेशांत सैनिक आणि सामान्य नागरिकांवर हल्ले करत आहेत. रस्त्यांच्या कडेला बॉम्ब पेरणे आणि दबा धरून हल्ले करणे, अशा पद्धतींचा त्या वापर करतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande