कोलंबियात बेकायदा सोन्याची खाण कोसळली; १४ जणांचा मृत्यू
बोगोटा, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।कोलंबियाच्या नैऋत्य भागातील एका बेकायदा सोन्याच्या खाणीत भूस्खलन होऊन १४ जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. एका प्रादेशिक अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. इक्वेडोरच्या सीमेलगत असलेला नारिन्यो हा बेकायदा खाणकामा
कोलंबियात बेकायदा सोन्याची खाण कोसळली; १४ जणांचा मृत्यू


बोगोटा, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।कोलंबियाच्या नैऋत्य भागातील एका बेकायदा सोन्याच्या खाणीत भूस्खलन होऊन १४ जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. एका प्रादेशिक अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली.

इक्वेडोरच्या सीमेलगत असलेला नारिन्यो हा बेकायदा खाणकामाचा प्रमुख केंद्रबिंदू आहे. या भागातील सशस्त्र गट सोन्याचा अवैध व्यापार, अमली पदार्थांची तस्करी आणि खंडणी वसुली यांसारख्या कारवायांवर नियंत्रण ठेवतात. समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोक आणि एक उत्खनन यंत्र खाणीतून मृतदेह बाहेर काढून जवळच्या नदीत असलेल्या एका छोट्या बोटीत ठेवताना दिसत आहेत. नारिन्योचे शांतता आणि सुरक्षा सचिव अॅलेक्स गोंझालेझ यांनी मृतांचा सुधारित आकडा सांगितला. तसेच, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जिवंत व्यक्तींचा शोध घेण्याचे काम आता थांबवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भौगोलिक परिस्थिती कठीण असल्याने आणि परिसरात गुन्हेगारी गट सक्रिय असल्यामुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचे राज्यपाल कार्यालयाने सांगितले.

कार्यालयातील एका सूत्राने वृत्तसंस्थाला सांगितले, “या समुदायांमधील लोकांकडे अशा अत्यंत धोकादायक कामांशिवाय उपजीविकेचा दुसरा पर्याय नाही. पारंपरिक पद्धतीने लहान प्रमाणात केले जाणारे खाणकाम जवळजवळ संपुष्टात आले आहे.”

कोलंबियामध्ये खाण दुर्घटना वारंवार घडतात. विशेषतः सरकारी नियम आणि कायद्यांची अंमलबजावणी होत नसलेल्या भागांमध्ये अशा दुर्घटनांचे प्रमाण अधिक आहे.सोमवारी ज्या नगरपालिकेत खाण कोसळली, तेथील स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र गटांनी काही व्यक्तींच्या निवडक हत्या केल्या आहेत. या व्यक्ती सुरक्षा दलांच्या किंवा प्रतिस्पर्धी संघटनांच्या संपर्कात असल्याचा अथवा त्यांनी सोने चोरल्याचा संशय असल्याने या हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande