

नवी दिल्ली / मुंबई, 21 ऑक्टोबर (हिं.स.) - मी ५०० कोटी दिलेही नाहीत आणि घेतलेही नाहीत. आरोप करण्यापूर्वी जरांगेंनी त्याची शहानिशा करायला हवी होती. त्यांच्याकडे पुरावे असतील तर संबंधित यंत्रणांकडे द्यावेत. चौकशी होऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले पाहिजे. तसेच जरांगे यांनी मराठा समाजाचे काम करावे; त्याला राजकीय व्यासपीठ बनवू नये, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी जरांगेंनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
शिंदे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकारने अनेक निर्णय घेतले असून, इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय दिला, असे शिंदे म्हणाले. आरक्षणाच्या माध्यमातून ५३०० पेक्षा अधिक जणांना नोकरीतील लाभ मिळाल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
जरांगे पाटील मराठा समाजाचं काम करत होते, तेव्हा मी मराठा समाजाला विविध कामांतून न्याय देण्याचं काम केलं. गेल्या 60 वर्षांत जे काम झालं नाही, ते आम्ही केलं. आजही मराठा समाजाचं आरक्षण टिकलेलं आहे. मराठा समाजाचंच काम मनोज जरांगे काम करत होते, त्यामुळे आम्ही त्यांना मदत दिली. त्यांनी राजकीय प्लटॅफॉर्म बनवू नये, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
दसरा मेळाव्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले होते. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून माझ्या नावाने 500 कोटी घेतल्याचा आरोप त्यांनी केला.
यावर एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी केलेल्या कामांचा संपूर्ण हिशोब मांडत, बीड शहरात शिंदे साहेब तुमचं जरा चुकलंच... अशा उपरोधात्मक आणि लक्षवेधी मजकुराचे बॅनर्स झळकले होते. आता बीड शहरात झळकलेल्या एका बॅनरने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी