
लखनऊ, 21 ऑक्टोबर (हिं.स.)।पोलीस स्मृतिदिनानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मोठी भेट देत विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली. क्षेत्रीय कर्तव्य बजावताना मिळणारा दुचाकी भत्ता दरमहा ७०० रुपयांवरून १,००० रुपये, प्रांतीय पोलीस सेवेतील (पीपीएस) अधिकाऱ्यांना पाच वर्षांत मिळणारा भत्ता ६,४०० रुपयांवरून १५,००० रुपये, तर सिमकार्ड आणि मोबाइल भत्ता २,००० रुपयांवरून २,५०० रुपये करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, पोलीस कर्मचारी अत्यंत कठीण परिस्थितीत आपली कर्तव्ये पार पाडतात. राज्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करणे यामध्ये पोलीस दलाची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुविधा आणि कल्याणाची काळजी घेणे हे सरकारचे प्राधान्य आहे.ते म्हणाले की, २०१७ नंतर राज्यातील पोलीस दल अधिक सक्षम करण्यासोबतच पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुविधांमध्येही सातत्याने वाढ करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांची सुविधा देणाऱ्या कॅशलेस आरोग्य कार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण क्षमतेतही अनेक पटींनी वाढ करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस कर्मचाऱ्यांना उत्तम संसाधने आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच निर्भयपणे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम करणे, हे सरकारचे उद्दिष्ट आहे. गरीब, पीडित, व्यापारी आणि महिलांच्या सुरक्षेची खात्री करण्याबरोबरच पोलीस कर्मचारी गुन्हेगारी आणि माफियांविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण प्रभावीपणे राबवत आहेत.ते म्हणाले की, पोलीस स्मृतिदिन हा केवळ वीरमरण पत्करलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्याचा दिवस नाही, तर त्यांच्या त्याग आणि बलिदानातून प्रेरणा घेऊन कर्तव्याप्रती अधिक समर्पित राहण्याचा संकल्प करण्याची संधीही आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode