राहुल गांधींच्या संघासंदर्भातील विधानावर स्मृती इराणींचे प्रत्युत्तर
राहुलच्या महिलांविषयीच्या भूमिकेवरून भाजपचा निशाणा तावडेंकडूनही टीका; राष्ट्र सेविका समितीच्या स्थापनेचा दिला संदर्भ नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला महिलाविरोधी ठरवणाऱ्या लोकसभेतील राहुल गांधी यांच्या विधानावरून भाजपन
स्मृती ईराणी यांचे संग्रहित छायाचित्र


राहुलच्या महिलांविषयीच्या भूमिकेवरून भाजपचा निशाणा

तावडेंकडूनही टीका; राष्ट्र सेविका समितीच्या स्थापनेचा दिला संदर्भ

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला महिलाविरोधी ठरवणाऱ्या लोकसभेतील राहुल गांधी यांच्या विधानावरून भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध करत, त्यांच्या वक्तव्यांतून महिलांविषयीची संकुचित विचारसरणी दिसून येत असल्याचा आरोप केला. तर भाजप नेते विनोद तावडे यांनीही राहुल गांधी यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संघपरिवाराशी संबंधित महिला संघटनांच्या कार्याचा संदर्भ दिला.

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला महिलांच्या भूमिकेबाबत पुरुषप्रधान विचारसरणी मानणारी संघटना असल्याचे म्हटले होते. राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, संघ ही पुरुषप्रधान विचारसरणी मानणारी संघटना आहे आणि महिलांना पुरुषांची मालमत्ता समजले जाते, असा त्यांचा आरोप आहे. तसेच, आपण ‘शिव-शक्ती’वर विश्वास ठेवत असल्याचे सांगत, संघाच्या विचारसरणीविरोधात लढण्याचा उल्लेख त्यांनी केला. संघाशी संबंधित अनेक महिला देखील आपल्यासोबत असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये केला होता.

त्यांच्या या विधानानंतर भाजप नेत्यांनी आक्षेप नोंदवला. स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना, महिलांविषयी अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नसल्याचे म्हटले. इराणी यांनी आरोप केला की, राहुल गांधी यांच्या विधानातून महिलांविषयीचा त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी कथितरीत्या केलेल्या धक्काबुक्की आणि मारहाणीचाही उल्लेख केला. या संदर्भातून महिलांप्रती त्यांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित होत असल्याचे इराणी म्हणाल्या. राहुल गांधी यांच्याकडून महिलांविषयी वारंवार अशा प्रकारच्या टिप्पण्या होत असतील, तर त्यावर महिलांची प्रतिक्रिया विचारण्यापेक्षा अशा वक्तव्यांच्या सामाजिक परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे. समाजातील महिलांचा सन्मान राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचेही स्मृती यांनी नमूद केले.

दरम्यान, भाजप नेते विनोद तावडे यांनीही राहुल गांधी यांच्या विधानावर आक्षेप घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारपरिवाराशी संबंधित अनेक महिला संवैधानिक, संघटनात्मक आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या नेतृत्वाची आणि सहभागाची अनेक उदाहरणे असल्याचा दावाही तावडे यांनी केला.तावडे यांनी राष्ट्र सेविका समितीच्या स्थापनेचा संदर्भ देत सांगितले की, 1936 मध्ये लक्ष्मीबाई केळकर, ज्यांना ‘मौसीजी’ म्हणून ओळखले जाते, यांनी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या प्रेरणेतून राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली होती.

राष्ट्र सेविका समिती ही स्वतंत्र महिला संघटना असून, तिची स्वतःची कार्यपद्धती, नेतृत्व आणि शाखा आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी वैचारिक साम्य असले तरी समितीचे स्वतंत्र संघटनात्मक स्वरूप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संघपरिवाराशी संबंधित विविध संघटनांमध्ये महिला महत्त्वाच्या भूमिका बजावत असून, राष्ट्रनिर्माण, समाजसेवा आणि नेतृत्वाच्या क्षेत्रांत त्यांचा सहभाग असल्याचेही तावडे यांनी नमूद केले.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande