दिल्ली प्रदूषित; अनेक निर्बंध लागू, रेस्टॉरंटच्या तंदूरमध्ये कोळसा, लाकूड वापरावर बंदी
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर (हिं.स.) - राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता फारच वाईट श्रेणीत गेल्याचे चित्र समोर आले आहे. ''कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट'' (CAQM) ने बुधवारी ''ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन'' (GRAP) अंतर्गत पहिल्या टप्प्य
दिल्ली प्रदूषण


नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर (हिं.स.) - राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता फारच वाईट श्रेणीत गेल्याचे चित्र समोर आले आहे. 'कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट' (CAQM) ने बुधवारी 'ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन' (GRAP) अंतर्गत पहिल्या टप्प्यातील (stage-I) निर्बंध लागू केले आहेत. यानुसार, रेस्टॉरंटच्या तंदूरमध्ये कोळसा आणि लाकूड वापरण्यावर बंदी असेल. डिझेल जनरेटरचा वापर केवळ आपत्कालीन किंवा अत्यावश्यक परिस्थितीतच करता येईल.

CAQM ने एका निवेदनात म्हटले आहे की, २० ऑक्टोबर रोजी दिल्लीचा 'एअर क्वालिटी इंडेक्स' (AQI) १७९ (मध्यम श्रेणी) होता, जो २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता वाढून २४४ (वाईट श्रेणी) वर पोहोचला आहे. GRAP हे आपत्कालीन उपाययोजनांचे एक संच आहे, जे हवेची गुणवत्ता एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त खराब होऊ नये म्हणून लागू केले जाते. जेव्हा AQI २०१ ते ३०० च्या दरम्यान असतो, तेव्हा GRAP चा पहिला टप्पा (GRAP-1) कार्यान्वित होतो. GRAP-1 अंतर्गत, प्रदूषणाला त्याच्या उगमस्थानीच रोखण्यावर भर दिला जातो. यामध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील 'तंदूर'मध्ये इंधन म्हणून कोळसा किंवा लाकडाचा वापर करण्यावर बंदी, तसेच कचरा, पालापाचोळा किंवा इतर टाकाऊ वस्तू जाळण्यावर बंदी घालणे यांसारख्या उपाययोजनांचा समावेश आहे.

राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात निर्बंध लागू आहेत. यामध्ये सर्व बांधकाम आणि पाडकाम ठिकाणी धूळ नियंत्रण करणे अनिवार्य आहे. ५०० चौरस मीटरपेक्षा मोठ्या प्रकल्पांसाठी धूळ व्यवस्थापन योजना मंजूर असणे आवश्यक आहे. कचरा, पालापाचोळा आणि इतर टाकाऊ वस्तू उघड्यावर जाळण्यास मनाई आहे. रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर आणि व्यावसायिक स्वयंपाकघरांमध्ये कोळसा किंवा लाकडाचा वापर करण्यास बंदी आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांनी स्वयंपाकासाठी केवळ वीज, गॅस किंवा इतर स्वच्छ इंधनाचाच वापर करावा. अत्यावश्यक किंवा आपत्कालीन परिस्थिती वगळता, डिझेल जनरेटरच्या वापरावर निर्बंध आहेत. ज्या वाहनांतून स्पष्टपणे प्रदूषण होत असल्याचे दिसून येईल, अशा वाहनांवर दंड आकारला जाऊ शकतो किंवा ती जप्त केली जाऊ शकतात. वाहतूक नियमांनुसार, महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली जाईल आणि वाहनचालकांना लाल सिग्नलवर इंजिन बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या जातील. दिल्लीमध्ये १० वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांवर आणि १५ वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल वाहनांवर बंदी कायम आहे.

याशिवाय नागरिकांना सल्ला देण्यात आला आहे की, लाल सिग्नलवर वाहनांचे इंजिन बंद ठेवावे आणि वाहन विनाकारण सुरू ठेवू नये. प्रदूषण कमी करण्यासाठी हायब्रिड किंवा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे. दिल्लीच्या ३०० किमी परिघात असलेल्या प्रदूषणकारी उद्योगांवर आणि औष्णिक वीज प्रकल्पांवर कठोर कारवाई केली जाईल. 'ग्रीन दिल्ली' (Green Delhi) ॲप, 'समीर' (SAMEER) ॲप वापरून किंवा ३११ (311) क्रमांकावर कॉल करून प्रदूषणाशी संबंधित समस्यांची तक्रार करा.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande