
इस्लामाबाद, 21 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनीच लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या हातातच देशाची सूत्रे असल्याचे संकेत दिले आहेत.यामुळे पाकिस्तानमधील नोकरशहांचे मोठ्या प्रमाणावर परदेशात स्थलांतर होत असल्याबद्दल ख्वाजा आसिफ यांनी चिंता व्यक्त केली आहे इस्लामाबादमधील प्रशासनावर लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा प्रभाव वाढत असल्याच्या बातम्यांदरम्यान, पाकिस्तानमधील सत्ताधारी वर्गाचा पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील निवडून आलेल्या सरकारवरील विश्वास कमी होत असल्याचे दिसत आहे.
ख्वाजा आसिफ यांनी समाजमाध्यम मंच ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमधील अनेक नोकरशहांनी कॅनडा, अमेरिका, ब्रिटन आणि युरोपमधील इतर देशांना आपले कायमस्वरूपी निवासस्थान बनवले आहे.”आसिफ यांनी पुढे सांगितले की, “या नोकरशहांनी पाकिस्तान सरकारमध्ये कार्यरत असतानाच नियोजनबद्ध पद्धतीने परदेशात स्थायिक होण्याची तयारी केली होती. त्यामुळे त्यांची स्वतःच्या देशाप्रती आणि नोकरीप्रती असलेल्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.”
वृत्तानुसार, संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, अलीकडच्या काही वर्षांत नोकरशहांच्या स्थलांतरासाठी पोर्तुगाल हे एक पसंतीचे ठिकाण म्हणून पुढे आले आहे. या प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत, ते महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते आणि वेगवेगळ्या सरकारांशी त्यांचे जवळचे संबंध होते, असेही त्यांनी नमूद केले.ख्वाजा आसिफ यांनी या नोकरशहांच्या निष्ठेवरही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “या सगळ्या गोष्टी संशयाच्या पलीकडे आहेत का? की हे अधिकारी केवळ काही काळासाठीच येथे थांबले होते? परदेशात स्थायिक होण्यापूर्वी हे नोकरशहा पाकिस्तानकडे केवळ एक तात्पुरता मुक्काम म्हणून पाहत होते का?”
शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) या पक्षाच्या विद्यमान सरकारला पाकिस्तान पीपल्स पार्टीचा पाठिंबा आहे. हे सरकार असीम मुनीर यांच्यावर अवलंबून असल्याचे मानले जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मर्जीत स्थान मिळवल्यानंतर असीम मुनीर यांचा पाकिस्तानमधील प्रभाव आणि राजकीय वर्चस्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode