पाकव्याप्त काश्मीरमध्ये २४ ऑक्टोबरपासून जेएएसीकडून पुन्हा मोठ्या आंदोलनाची तयारी
इस्लामाबाद, 21 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीरमधील (पीओजेके) पूंछ विभागात जम्मू-काश्मीर जॉइंट अवामी अॅक्शन कमिटीने (जेएएसी) २४ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा मोठे आंदोलन छेडण्याची तयारी केली आहे. या भागात इंटरनेटवरील निर्बंध, बाजार
Preparations underway for another major protest in Pakistan-occupied Kashmir starting October 24


इस्लामाबाद, 21 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीरमधील (पीओजेके) पूंछ विभागात जम्मू-काश्मीर जॉइंट अवामी अॅक्शन कमिटीने (जेएएसी) २४ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा मोठे आंदोलन छेडण्याची तयारी केली आहे. या भागात इंटरनेटवरील निर्बंध, बाजारपेठा अंशतः बंद असणे, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याशी संबंधित समस्या आणि राजकीय प्रतिनिधित्वावरून अद्याप तणाव कायम आहे.

सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, कोटली हे आंदोलनाचे प्रमुख केंद्र बनवण्यात आले असून, तेथे मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी रावळाकोट आणि अब्बासपूर येथे सुरू असलेली धरणे कोटलीतील मुख्य सभेत सहभागी होतील. तसेच मुझफ्फराबाद आणि मीरपूर येथे चक्का जाम आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे.या भागातील दळणवळण सेवा अद्याप पूर्णपणे पूर्ववत झालेल्या नाहीत. मुझफ्फराबादमध्ये सुमारे १३६ दिवसांनंतर इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र, पूंछ आणि कोटलीच्या काही भागांत मोबाइल आणि इंटरनेटवरील निर्बंध अद्याप कायम आहेत. त्यामुळे विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी वाढत आहेत. आंदोलकांनी नागरी सुविधा पूर्ववत करण्याची आणि सुरक्षा निर्बंध हटवण्याची मागणी पुन्हा केली आहे.

जेएएसीचे आंदोलन वाढीव वीजबिले, गव्हाच्या पिठाच्या किमती आणि आर्थिक मदतीच्या मागण्यांमधून सुरू झाले होते. त्यानंतर मागण्यांच्या निवेदनात शासन आणि प्रशासनाची उत्तरदायित्व निश्चित करणे, नागरिकांचे हक्क, सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा आणि विधानसभेतील राजकीय प्रतिनिधित्व या मुद्द्यांचाही समावेश झाला. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या काश्मिरी निर्वासितांसाठी विधानसभेत असलेल्या १२ आरक्षित जागा रद्द करण्याची मागणी हा या वादातील प्रमुख मुद्दा आहे. या जागांची सध्याची व्यवस्था स्थानिक मतदारांच्या प्रतिनिधित्वावर परिणाम करत असल्याचा दावा जेएएसीने केला आहे.

जुलै ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या मोठ्या आंदोलनादरम्यान पाकिस्तानी लष्कराने १५० आंदोलकांची हत्या केल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. तसेच, सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराने सुमारे २०० महिला आणि तरुणींचे अपहरण केले असून, त्यांच्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. आंदोलकांना दहशतवादी घोषित करण्यात आले, तर नरसंहाराच्या घटनांनंतर प्रभावित भागांत रेंजर्सनाही तैनात करण्यात आले.

२४ ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी स्थानिक कठपुतळी सरकार आणि पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी जेएएसीच्या नेतृत्वासोबत ठोस आणि सन्मानजनक राजकीय तोडगा काढला नाही, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे. यावेळीही आपली फसवणूक झाल्यास पुन्हा मोठे आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा जेएएसीने यापूर्वीच दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande