
वॉशिंग्टन, 21 ऑक्टोबर (हिं.स.)।सध्या रशिया विरुद्धच्या युद्धात युक्रेनला अमेरिकेकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे. याचे उदाहरण म्हणजे, एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीवर युक्रेनच्या लष्कराकडून वापरण्यात येणाऱ्या स्टारलिंक उपग्रह इंटरनेट सेवेत अडथळे निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एका वृत्तानुसार, मस्क यांनी युक्रेनच्या महत्त्वपूर्ण लष्करी स्टारलिंक नेटवर्कचा वेग जाणूनबुजून कमी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये खळबळ उडाली.या निर्णयामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासनही आश्चर्यचकित झाल्याचे वृत्तात अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे. मात्र, अमेरिकन अधिकाऱ्यांनी स्टारलिंकचा वेग कमी करण्याचे कोणतेही आदेशदिला नसल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ म्हणाले, “आम्ही कोणतीही सेवा बंद केलेली नाही. आमच्याकडून काहीही बदललेले नाही आणि आम्ही कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.” स्टारलिंक सेवेत झालेले कोणतेही बदल हे उपग्रह सेवा पुरवठादाराच्या करारातील अटींनुसार होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनीही व्हाइट हाऊसने स्टारलिंकचा वेग कमी करण्याचे आदेश दिल्याच्या दाव्यांचे खंडन केले. स्टारलिंक ही स्पेसएक्सची व्यावसायिक सेवा आहे, तर स्टारशील्ड ही अमेरिकेची लष्करी प्रणाली आहे. स्टारशील्डची सेवा युक्रेनला उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी मस्क यांच्यावर युक्रेनचा स्टारलिंक सेवेवरील प्रवेश मर्यादित केल्याचा आरोप केला. यामुळे लष्करी मोहिमांवर परिणाम झाल्याचे त्यांनी म्हटले. एका मुलाखतीत झेलेन्स्की म्हणाले, “ते नेमके काय करत आहेत, याची त्यांना जाणीव होती, हे मी खात्रीने सांगू शकतो. रात्री एक वाजता स्पेसएक्स आणि अमेरिकेने स्टारलिंक सेवा रोखली.”युक्रेनचे लष्कर टेहळणी आणि शत्रूचे ड्रोन रोखण्यासाठी वापरण्यात येणारी ड्रोन यंत्रणा चालवणे, गुप्तचर माहिती गोळा करणे तसेच युद्धभूमीवरील इतर महत्त्वाच्या कामांसाठी स्टारलिंकवर अवलंबून आहे. या सेवेत अडथळे निर्माण झाल्याने लष्करी दळणवळण आणि विविध मोहिमांमधील समन्वयावर परिणाम झाला.
दरम्यान, युक्रेनचे माजी संरक्षणमंत्री मिखाइलो फेडोरोव्ह यांनी नंतर सांगितले की, स्टारलिंकची जोडणी ताशी १६० किलोमीटर वेगापर्यंत बहाल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, स्टारशील्डवरील वेगमर्यादा पूर्णपणे हटवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मस्क यांचे आभार मानतानाच त्यांनी भविष्यातही सहकार्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode