
पॅरिस , 21 ऑक्टोबर (हिं.स.)।फ्रान्सच्या पूर्वेकडील भागात हवाई तळावर उतरण्याच्या तयारीत असताना ‘मिराज २००० डी’ हे लढाऊ विमान कोसळले. रात्रीच्या प्रशिक्षण मोहिमेदरम्यान झालेल्या या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, दुसरा कर्मचारी अद्याप बेपत्ता आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, मंगळवारी, २० ऑक्टोबर रोजी उशिरा संध्याकाळी ‘मिराज २००० डी’ हे लढाऊ विमान आपल्या हवाई तळाकडे परतत होते. त्याच वेळी नॅन्सी-ओशे हवाई तळाच्या सुमारे १८ किलोमीटर वायव्येला असलेल्या रोगेव्हिल परिसरात ते कोसळले. फ्रान्सच्या सशस्त्र दलांनी एका कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडल्याची पुष्टी केली असून, दुसऱ्या कर्मचाऱ्याचा शोध सुरू असल्याचे सांगितले आहे. फ्रान्सच्या हवाई आणि अवकाश दलाने अधिकृत निवेदनाद्वारे शोधमोहीम आणि तपास सुरू असल्याची माहिती दिली.
स्थानिक अधिकारी यवेस सेगुई यांनी सांगितले की, ज्या जंगल परिसरात विमान कोसळले, तेथे प्रतिकूल हवामान असूनही रात्रभर शोधमोहीम राबवण्यात आली.हे लढाऊ विमान जवळच असलेल्या १३३व्या नॅन्सी-ओशे हवाई तळावरील होते. रात्रीची प्रशिक्षण मोहीम पूर्ण करून विमान हवाई तळावर उतरण्याच्या तयारीत असतानाच ही दुर्घटना घडली. नॅन्सी-ओशे हवाई तळाचे कमांडंट कर्नल लुडोविक हम्बर्ट यांनी सांगितले की, विमानातील ‘शस्त्र प्रणाली अधिकारी’ हा अनुभवी सैनिक होता. तो एका तरुण वैमानिकासोबत उड्डाण करत होता. या दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.
‘मिराज २००० डी’ हे दोन आसनी लढाऊ विमान असून, त्याची निर्मिती प्रामुख्याने जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ले करण्यासाठी करण्यात आली आहे. फ्रान्सच्या सशस्त्र दल मंत्रालयाच्या माहितीनुसार, हे विमान अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीतही कार्य करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. पारंपरिक हवाई मोहिमा तसेच लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करण्याच्या मोहिमाही हे विमान प्रभावीपणे पार पाडू शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode