मिलानमधील हिंसाचारानंतर इटली सरकारचा कठोर पवित्रा; अल्पवयीनांच्या नुकसानीची भरपाई पालकांकडून
रोम, 21 ऑक्टोबर (हिं.स.)इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मिलानमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर आणि लुटमारीच्या घटनांनंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी नव्या उपाययोजनांची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत वर्षअखेरपर्यंत मिलानमध्ये अतिर
मिलानमधील हिंसाचारानंतर इटली सरकारचा कठोर पवित्रा; अल्पवयीनांच्या नुकसानीची भरपाई पालकांकडून


रोम, 21 ऑक्टोबर (हिं.स.)इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मिलानमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर आणि लुटमारीच्या घटनांनंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी नव्या उपाययोजनांची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत वर्षअखेरपर्यंत मिलानमध्ये अतिरिक्त ५०० सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. तसेच, अल्पवयीन मुलांनी केलेल्या तोडफोडीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांच्या पालकांकडून वसूल केली जाणार आहे.

नव्या योजनेनुसार, १४ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अल्पवयीन मुलांवर खटला चालवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली जाणार आहे. हिंसक निदर्शनांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि २० हजार युरोंपर्यंतचा दंड होऊ शकतो.शनिवारी मिलानमध्ये आंदोलकांनी दुकानांमध्ये लुटमार केली, मालमत्तांना आग लावली आणि पोलिसांशी संघर्ष केला. या घटनांमध्ये सुमारे १० लाख युरोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या, “मिलानसह इटलीतील इतर शहरांमध्ये आठवड्याच्या अखेरीस झालेल्या हिंसाचाराची दृश्ये आपण सर्वांनी पाहिली आहेत. दुकानांची लूट करण्यात आली, खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या आणि सुरक्षा दलांवर हल्ले करण्यात आले. अशी दृश्ये कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत. या घटनांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांचे समर्थन करणेही योग्य ठरू शकत नाही. त्यामुळेच आज मंत्रिमंडळाने हा हिंसाचार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नव्या उपाययोजनांचा समावेश असलेला अध्यादेश मंजूर केला आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “या उपाययोजना गेल्या काही महिन्यांत मंजूर करण्यात आलेल्या निर्णयांना पूरक ठरतील. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनेही केली जाणारी जैवमितीय ओळख प्रणाली समाविष्ट आहे. यामुळे मुखवटा किंवा हुड घालून चेहरा लपवणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवणे शक्य होईल.”

चौकांमध्ये निदर्शने करणारे हे लोक कोण होते, असा प्रश्न उपस्थित करत मेलोनी म्हणाल्या की, हे नेहमीच गोंधळ घालणारे गट होते. प्रत्येक मोर्चात वाद घालण्याची आणि हिंसाचार करण्याची संधी शोधणारे हे लोक आहेत. मात्र, यावेळी या गटांमध्ये आणखी एक बाब दिसून आली. सोशल मीडियावरील एक व्हिडीओ पाहून शेकडो तरुण, त्यापैकी अनेक अल्पवयीन, लहान लहान गटांमध्ये घटनास्थळी पोहोचले होते.

या मुलांनी तोडफोड करणे, चोरी करणे आणि असे प्रकार करतानाचे स्वतःचे व्हिडीओ चित्रित करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. ही एक गंभीर प्रवृत्ती असून तिच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अशा घटनांचे अनुकरण इतरांनी करू नये आणि हिंसक कृत्ये इतरांसाठी आदर्श ठरू नयेत, यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत, असेही मेलोनी यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande