
नवी दिल्ली , 21 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी अमेरिका-पाकिस्तान संबंधांबाबत नुकतेच महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे इस्लामाबादची चिंता निश्चितच वाढू शकते.मार्को रुबियो यांनी पाकिस्तान आणि चीनसोबतच्या वॉशिंग्टनच्या संबंधांबाबत भारताची बाजू घेत स्पष्ट केले की, हे संबंध कधीही भारताच्या हिताची किंमत मोजून प्रस्थापित केले जाणार नाहीत.
एका मुलाखती दरम्यान रुबियो यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाची तुलना माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि त्यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार हेन्री किसिंजर यांच्या काळाशी करणे योग्य ठरणार नसल्याचे सांगितले. यामागील कारण स्पष्ट करताना त्यांनी म्हटले की, त्या काळातील आणि आजच्या जागतिक परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. १९७० च्या दशकात शीतयुद्ध सुरू होते; मात्र आज तशी परिस्थिती नाही. त्यामुळे त्या दशकाच्या तुलनेत भारतासह संपूर्ण जग बदलले आहे.
पाकिस्तान आणि तेथील लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी ट्रम्प यांचे वाढत असलेले संबंध याबाबत विचारले असता, रुबियो यांनी स्पष्ट केले की, जगातील कोणत्याही देशाशी अमेरिकेचे संबंध भारतासोबतच्या संबंधांच्या किंमतीवर प्रस्थापित केले जाणार नाहीत. भारतासोबतच्या संबंधांना महत्त्व देत त्यांनी सांगितले की, अमेरिका या दृष्टिकोनातून विचार करत नाही.याचा पुरावा म्हणून त्यांनी स्वतःचा भारत दौरा, दोन्ही देशांदरम्यान व्यापार करार करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि आतापर्यंत झालेल्या चर्चांचा उल्लेख केला. “आम्ही एकत्रितपणे काम करतो,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, रुबियो यांनी पाकिस्तानसोबतचे संबंध पूर्णपणे नाकारले नाहीत. ते म्हणाले, “पाकिस्तान हा असा देश आहे, ज्याच्याशी आमचे संबंध आहेत आणि असे संबंध असणेही आवश्यक आहे.”दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode