
वॉशिंग्टन, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।रशियाने बुधवारी ७४ वर्षीय अमेरिकन नागरिक स्टीफन हबर्ड यांची तुरुंगातून सुटका केली. २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणादरम्यान हबर्ड यांनी युक्रेनच्या बाजूने ‘भाडोत्री सैनिक’ म्हणून युद्धात भाग घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अलीकडेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात त्यांनी हबर्ड यांच्या सुटकेची मागणी केली होती.या सुटकेचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, यापूर्वी झालेल्या कैदी अदलाबदलीच्या करारांपेक्षा यावेळची प्रक्रिया वेगळी होती. हबर्ड यांच्या सुटकेच्या बदल्यात अमेरिकेला रशियाच्या ताब्यातील कोणत्याही कैद्याची सुटका करावी लागली नाही.अमेरिकेचे वरिष्ठ राजनैतिक प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ यांच्या सेंट पीटर्सबर्ग दौऱ्यादरम्यान हा करार अंतिम झाला. पुतिन यांच्यासोबत झालेल्या प्रत्यक्ष भेटीत विटकॉफ यांनी हबर्ड यांच्या सुटकेची विनंती करताना पुतिन यांना ‘मानवतावादी’ नेता म्हणून संबोधले.
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनीही या सुटकेला दुजोरा दिला. पुतिन यांनी पूर्णपणे मानवतावादी दृष्टिकोनातून हबर्ड यांना माफी देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सुटकेनंतर हबर्ड यांना सेंट पीटर्सबर्ग येथील पुल्कोव्हो विमानतळावरून अमेरिकेला रवाना करण्यात आले.
मिशिगनचे रहिवासी असलेले स्टीफन हबर्ड हे निवृत्त शिक्षक असून, अनेक वर्षांपासून युक्रेनमध्ये वास्तव्यास होते. रशियाच्या म्हणण्यानुसार, २०२२ मध्ये आक्रमण सुरू झाल्यानंतर हबर्ड यांनी युक्रेनच्या सैन्यासोबत करार केला होता. त्यानंतर दोन महिन्यांनी त्यांना पकडण्यात आले.
२०२४ मध्ये बंद न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांना जवळपास सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, अमेरिकन सरकार, हबर्ड यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या कायदेशीर पथकाने रशियाचे हे आरोप सातत्याने फेटाळून लावले होते. त्यांनी हबर्ड यांना निर्दोष ठरवले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode