
तेहरान , 22 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेच्या माध्यमांमध्ये अमेरिका आणि इस्रायल इराणवर नव्याने हल्ले करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण पश्चिम आशियातील तणाव वाढला आहे. अमेरिकेत मध्यावधी निवडणुकांची प्रक्रिया सुरू असतानाच या घडामोडी घडत आहेत. वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद मुजतबा हुसेनी खामेनेई यांनी इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबाफ यांची भेट घेतली. कतार आणि पाकिस्तानसारख्या देशांच्या मध्यस्थीने अमेरिकेसोबत सुरू असलेल्या चर्चेचे नेतृत्व गालिबाफ करत आहेत.
इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, या बैठकीत अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी हल्ल्यांशी संबंधित ताज्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला. तसेच इराणच्या सामर्थ्याचे स्रोत अधिक बळकट करण्याच्या गरजेवर भर देण्यात आला.खामेनेई यांनी सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकता टिकवून ठेवण्यात व ती अधिक मजबूत करण्यात संसद सदस्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे नमूद केले. इस्लामिक प्रजासत्ताक आणि सशस्त्र दलांच्या समर्थनार्थ इराणी नागरिक सातत्याने सार्वजनिक सभांमध्ये सहभागी होत असल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे कौतुक केले. अशा सहभागाला त्यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संबोधले. या बैठकीचे कोणतेही अधिकृत छायाचित्र माध्यमांसाठी प्रसिद्ध करण्यात आले नाही.
एका वृत्तानुसार, अमेरिकन आणि इस्रायली सैन्याने इराणवर नव्याने हल्ले करण्याची योजना तयार केली आहे. इस्रायलमध्ये अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर ही योजना आखण्यात आल्याचे सांगितले जाते. वृत्तानुसार, संभाव्य लक्ष्यांमध्ये इराणची ऊर्जा पायाभूत सुविधा, अणुप्रकल्प तसेच क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा साठा यांचा समावेश असू शकतो.
या संभाव्य हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इराणने अधिक कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. नव्याने हल्ला झाल्यास त्याला यापूर्वीपेक्षाही अधिक तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल, असे इराणने स्पष्ट केले आहे.
इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रेजाई यांनी सांगितले की, इराणच्या सशस्त्र दलांनी अत्यंत विध्वंसक योजना तयार केली आहे. ही योजना हल्लेखोरांना परिचित असलेल्या नियमांनुसार नसेल, असेही त्यांनी बजावले.इराणच्या माध्यमांनी एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तणाव वाढत असताना इराणने व्यापक आणि बहुस्तरीय युद्धासाठी पूर्ण तयारी केली आहे. इराणचा निर्णय ठाम असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. नव्याने लष्करी हल्ला झाल्यास त्याला असे प्रत्युत्तर दिले जाईल की, संपूर्ण प्रदेशातील हल्लेखोर आणि त्यांच्या समर्थकांचे हितसंबंध व उद्दिष्टे लक्ष्य केली जातील, असा इशाराही त्यांनी दिला.
अमेरिकेकडून नव्याने हल्ले होण्याची शक्यता आणि इराणची प्रत्युत्तराची तयारी यामुळे पश्चिम आशिया पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. या प्रदेशात पुन्हा संघर्ष सुरू झाल्यास अनिश्चिततेचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेत इंधनाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode