सौदी अरेबियाच्या दम्माम विमानतळावर हुती बंडखोरांचा हल्ला; एकाचा मृत्यू, आठ जखमी
रियाध, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।सौदी अरेबियाच्या पूर्वेकडील दम्माम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी संध्याकाळी हल्ला झाला. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य आठ जण जखमी झाले आहेत. सौदी अरेबियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरण
सौदी अरेबियाच्या दम्माम विमानतळावर हुती बंडखोरांचा हल्ला; एकाचा मृत्यू, आठ जखमी


रियाध, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।सौदी अरेबियाच्या पूर्वेकडील दम्माम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी संध्याकाळी हल्ला झाला. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य आठ जण जखमी झाले आहेत. सौदी अरेबियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने ही माहिती दिली.

प्राधिकरणाच्या निवेदनानुसार, जखमींची प्रकृती किरकोळ ते गंभीर स्वरूपाची आहे. विमानतळाचे किती नुकसान झाले आहे, याचे मूल्यांकन केले जात आहे.हा हल्ला नेमका कशा प्रकारे करण्यात आला, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, अलीकडच्या काळात इराणसमर्थित येमेनमधील हुती बंडखोरांकडून क्षेपणास्त्रे आणि अन्य प्रक्षेपकांच्या साहाय्याने सौदी अरेबियातील विमानतळांवर वारंवार हल्ले केले जात आहेत.या हल्ल्यामुळे परिसरातील वाढत्या तणावात आणखी भर पडली आहे. हुती बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे सौदी अरेबियातील अनेक विमानतळ यापूर्वीही प्रभावित झाले आहेत.

दरम्यान सौदी अरेबियातील शैबा तेलक्षेत्रावर झालेल्या हल्ल्यात एक भारतीय नागरिक जखमी झाला आहे. सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दूतावासाने ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत सांगितले की, बुधवारी शैबा तेलक्षेत्रावर झालेल्या हल्ल्यात एक भारतीय नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी दूतावास सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, अधिक माहितीची प्रतीक्षा करत आहे. जखमी भारतीय नागरिकाला शक्य ती सर्व मदत पुरवण्यात येईल, असेही दूतावासाने स्पष्ट केले.

शैबा तेलक्षेत्र हे सौदी अरेबियातील तेल उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र आहे. परिसरात अलीकडच्या काळात हुती बंडखोरांचे हल्ले आणि वाढता तणाव यांदरम्यान ही घटना घडली आहे. भारतीय दूतावास जखमी नागरिकाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असून, त्याला आवश्यक ती मदत मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे.

दरम्यान, सौदी अरेबियावर हुती बंडखोरांकडून सातत्याने घातक हल्ले होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बुधवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. सौदी अरेबियातील अमेरिकन दूतावासातील अत्यावश्यक सेवांशी संबंधित नसलेल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना देश सोडण्याचे आदेश वॉशिंग्टनने दिले आहेत.खाडी प्रदेशातील अमेरिकन दूतावासातील सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती एका राजनैतिक सूत्राने दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande