
विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संकल्पना मांडण्याचे आवाहन
मुंबई, 22 ऑक्टोबर (हिं.स.) : गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणे, गुंतवणुकीविषयी जागरूकता निर्माण करणे आणि सायबर फसवणुकीपासून संरक्षणासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याच्या उद्देशाने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ने ‘रीइमॅजिन आयडियाथॉन २.०’ सुरू केली आहे. देशभरातील विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होऊन नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील अव्वल पाच संघांसाठी एकूण ११.५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. नोंदणी ७ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली आहे.
जागतिक गुंतवणूकदार सप्ताह २०२६ अंतर्गत ‘समज से इन्व्हेस्टिंग सिम्पल’ या संकल्पनेशी जोडलेल्या या उपक्रमाला सेबीच्या ‘प्रोजेक्ट जागरूक’ची जोड आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरता आणि डिजिटल सुरक्षिततेविषयी सोप्या, आकर्षक आणि सर्वसमावेशक पद्धतीने जागरूकता निर्माण करणारे उपाय विकसित करण्याची संधी यातून मिळणार आहे. नव्याने गुंतवणूक करणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण गुंतवणूकदार यांच्या गरजांवर विशेष भर दिला जाणार आहे.
सेबीच्या इन्व्हेस्टर सर्व्हे २०२५ नुसार, भारतातील अंदाजे ३३.७२ कोटी कुटुंबांपैकी केवळ ३.२१ कोटी कुटुंबे, म्हणजेच ९.५ टक्के कुटुंबे, सिक्युरिटीज मार्केटमधील उत्पादनांमध्ये गुंतवणूक करतात. दुसरीकडे, ६३ टक्के कुटुंबांना अशा किमान एका उत्पादनाची माहिती आहे. जागरूकता आणि प्रत्यक्ष गुंतवणूक यांतील ही तफावत दूर करण्याची गरज या आकडेवारीतून अधोरेखित होते. तसेच, २०२५ मध्ये सायबर फसवणुकीमुळे २२,४९५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची सरकारी आकडेवारी असून, त्यातील ७६ टक्के नुकसान बनावट गुंतवणूक आणि ट्रेडिंग घोटाळ्यांमुळे झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सीडीएसएलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहल वोरा यांनी सांगितले की, गुंतवणूकदारांना माहितीची पडताळणी करणे, जोखीम आणि लाभांचे मूल्यांकन करणे तसेच विचारपूर्वक निर्णय घेणे यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेच्या माध्यमातून अधिक जागरूक, जबाबदार आणि सर्वसमावेशक गुंतवणूकदार परिसंस्था उभारण्यास या उपक्रमाची मदत होईल.
स्पर्धकांना मोबाइल अॅप्स, वेबसाइट्स, चॅटबॉट्स, गेम्स, सिम्युलेशन्स, जनजागृती मोहिमा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सहाय्यक अशा विविध माध्यमांतून संकल्पना सादर करता येतील. नाविन्यता, उपयुक्तता, व्यवहार्यता, विस्तारक्षमता, सुलभता आणि डेटा संरक्षण या निकषांवर बहुविद्याशाखीय परीक्षक मंडळाकडून मूल्यमापन होईल. या मंडळाचे अध्यक्ष एस. रामदोराई असतील.नोंदणी, स्पर्धेचे नियम, मूल्यमापन निकष आणि वेळापत्रक यांची सविस्तर माहिती https://ideathon.cdslindia.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis