दसऱ्यानंतर सोन्या-चांदीचे भाव उतरले!
जळगाव, 22 ऑक्टोबर (हिं.स.) दिवाळीच्या खरेदीसाठी तयारी करणाऱ्या ग्राहकांसाठी जळगावच्या सराफा बाजारातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. दसऱ्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून, गुरुवारी बाजारपेठ उघडताच सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १,७
दसऱ्यानंतर सोन्या-चांदीचे भाव उतरले!


जळगाव, 22 ऑक्टोबर (हिं.स.) दिवाळीच्या खरेदीसाठी तयारी करणाऱ्या ग्राहकांसाठी जळगावच्या सराफा बाजारातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. दसऱ्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून, गुरुवारी बाजारपेठ उघडताच सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १,७६२ रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलो ६,१८० रुपयांची घट नोंदविण्यात आली. त्यामुळे दिवाळीची खरेदी तसेच आगामी लग्नसराईसाठी दागिने घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

जळगावच्या सुवर्ण बाजारात दसऱ्याच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५०,३०८ रुपयांपर्यंत पोहोचले होते. बुधवारी त्यात किरकोळ २०६ रुपयांची घट होऊन भाव १,५०,१०२ रुपयांवर आले. मात्र, गुरुवारी सकाळी बाजार उघडताच थेट १७६२ रुपयांची मोठी घट नोंदवली गेली, ज्यामुळे सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४८,३४० रुपयांवर खाली आले आहे.

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी नरमाई दिसून आली आहे. दसऱ्याच्या दिवशी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,१६,३०० रुपयांवर होते. बुधवारी दरात कोणतीही हालचाल झाली नाही, परंतु गुरुवारी सकाळी बाजार उघडताच तब्बल ६१८० रुपयांची घसरण नोंदवली गेली. यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,१०,१२० रुपयांपर्यंत घसरले आहेत.दिवाळी आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदीला महत्त्व असते. मात्र, गेल्या काही काळातील वाढलेल्या दरांमुळे अनेक ग्राहकांनी दागिने खरेदीचा निर्णय पुढे ढकलला होता. आता दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना खरेदीचे नियोजन करण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान, सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये बाजारातील परिस्थितीनुसार चढ-उतार होऊ शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदी करताना त्या दिवसाचे दर, जीएसटी आणि दागिन्यांवरील घडणावळ यांची माहिती सराफाकडून घेणे आवश्यक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande