
सना, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।येमेनमधील हुती बंडखोरांनी दावा केला आहे की, लाल समुद्रातील जुकार बेटाजवळ १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणाऱ्या एका नौकेला वाचवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. सौदी अरेबियाने या नौकेला लक्ष्य केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
वृत्तानुसार, हुती बंडखोरांनी म्हटले आहे की, “सौदी शत्रूने जुकार बेटाजवळ १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणाऱ्या भारतीय नौकेला लक्ष्य केले. येमेनी सशस्त्र दलांनी या नागरिकांना वाचवले असून, याबाबतची अधिक माहिती नंतर दिली जाईल.”त्यांनी पुढे म्हटले की, “सौदी शत्रूची ही बेजबाबदार कृती लाल समुद्रातील आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी धोकादायक आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने सौदी अरेबियाला अशा बेजबाबदार कृती करण्यापासून रोखले पाहिजे.”
दरम्यान सौदी अरेबियातील दम्माम विमानतळावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून, अन्य दोन जण जखमी झाले आहेत. याशिवाय, शायबाह तेलक्षेत्रातही एका भारतीय नागरिकाला दुखापत झाली आहे. या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे.सौदी अरेबियातील नागरिक आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) एका निवेदनात म्हटले आहे की, “सौदी अरेबियातील नागरिक आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. यामध्ये २१ ऑक्टोबर रोजी दम्माम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि पूर्व प्रांतातील सौदी अरामकोच्या शायबाह तेलक्षेत्रावर झालेल्या हल्ल्यांचाही समावेश आहे.”
दरम्यान, येमेनच्या संरक्षण मंत्रालयाने इशारा दिला आहे की, हुती बंडखोरांच्या नियंत्रणाखालील भागांत त्यांच्या समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चांना वैध लष्करी लक्ष्य मानले जाऊ शकते. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव वाढत असताना या घडामोडी समोर आल्या आहेत.
इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी रात्री होर्मुझच्या सामुद्रधुनीत सात तेलवाहू जहाजे नष्ट झाली किंवा त्यांना आग लागली. या जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमुळे किंवा नौदलाच्या सुरुंगांना धडकल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे.या वृत्ताला दुजोरा मिळाल्यास, २८ फेब्रुवारी रोजी इराण युद्ध सुरू झाल्यापासून एकाच दिवसात या सागरी मार्गावर नष्ट झालेल्या जहाजांची ही सर्वाधिक संख्या ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode