तिबेटमध्ये ७ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; १६ जणांचा मृत्यू तर ५४ जखमी, बचावकार्य सुरु
ल्हासा, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।चीनच्या तिबेट प्रदेशात गुरुवारी जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी संध्याकाळी झालेल्या ७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपात किमान १६ जणांचा मृत्यू झाला, तर अन्य ५४ जण जखमी झाले. या भूकंपामुळे शेकडो घरांचे नुक
तिबेटमध्ये ७ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; १६ जणांचा मृत्यू तर ५४ जखमी, बचावकार्य सुरु


ल्हासा, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।चीनच्या तिबेट प्रदेशात गुरुवारी जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी संध्याकाळी झालेल्या ७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपात किमान १६ जणांचा मृत्यू झाला, तर अन्य ५४ जण जखमी झाले. या भूकंपामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले असून, नागचू या उत्तरेकडील शहरात आपत्कालीन बचावकार्य सुरू आहे. भूकंपानंतर आसपासच्या भागांत ३ ते ४ रिश्टर स्केल तीव्रतेचे अनेक सौम्य धक्केही जाणवले. जानेवारी २०२४ नंतर चीनमध्ये झालेला हा सर्वाधिक शक्तिशाली भूकंप असल्याचे सांगण्यात येत आहे.

शहराच्या माध्यम कार्यालयाने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, किमान ३३९ घरे कोसळली आहेत. जखमींपैकी ११ जणांची प्रकृती गंभीर असून, २१ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान नागरिकांना ढिगाऱ्यांतून बाहेर काढण्यासाठी तसेच बेघर झालेल्या लोकांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बचाव पथकांकडून नागरिकांसाठी तंबूही उभारले जात आहेत.या भूकंपाचे केंद्र तिबेटची राजधानी ल्हासा येथून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर होते. भूकंपाचे जोरदार धक्के जाणवताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

चीन भूकंप नेटवर्क केंद्राच्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार रात्री सुमारे १० वाजून ३३ मिनिटांनी हा भूकंप झाला. त्याची तीव्रता ७ रिश्टर स्केल इतकी होती. उत्तर तिबेटमधील नागचू परिसरात जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते. हा परिसर समुद्रसपाटीपासून सरासरी सुमारे ४,८६४ मीटर उंचीवर आहे.

सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या केंद्राजवळील एका गावात दोन जण जखमी झाले आहेत. तसेच आसपासच्या गावांमधील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. स्थानिक सरकारी माध्यमांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओंमध्ये नागरिक भीतीपोटी घराबाहेर पडताना दिसत आहेत. काही नागरिकांनी घराबाहेर मोकळ्या जागेत, तर काहींनी रस्त्यावर उभ्या असलेल्या आपल्या वाहनांमध्ये आश्रय घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande