संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवपदाच्या शर्यतीत यूएईच्या लाना नुसेइबेह; उमेदवारांची संख्या आठ
आल्बनी, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।संयुक्त राष्ट्रांच्या पुढील महासचिवपदासाठीची स्पर्धा आता अधिकच रंगतदार झाली आहे. महासचिवांच्या निवडीवरून सुरक्षा परिषदेत निर्माण झालेल्या कोंडीदरम्यान संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) लाना नुसेइबेह याही या पदाच्या शर्यतीत
संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवपदाच्या शर्यतीत यूएईच्या लाना नुसेइबेह; उमेदवारांची संख्या आठ


आल्बनी, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।संयुक्त राष्ट्रांच्या पुढील महासचिवपदासाठीची स्पर्धा आता अधिकच रंगतदार झाली आहे. महासचिवांच्या निवडीवरून सुरक्षा परिषदेत निर्माण झालेल्या कोंडीदरम्यान संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) लाना नुसेइबेह याही या पदाच्या शर्यतीत उतरल्या आहेत.

यूएईने बुधवारी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री नुसेइबेह यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यामुळे विद्यमान महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचे उत्तराधिकारी होण्यासाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या आठ झाली आहे. गुटेरेस यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपणार आहे.सुरक्षा परिषदेत आधीपासूनच असलेल्या उमेदवारांना अलीकडे झालेल्या अनौपचारिक मतदानात किमान दोन स्थायी सदस्यांकडून नकारात्मक मते मिळाली आहेत. अशा परिस्थितीत नुसेइबेह यांच्यासमोरही पाचही स्थायी सदस्यांचा पाठिंबा मिळवण्याचे मोठे आव्हान असेल.

विशेष म्हणजे, नुसेइबेह यांना योगाची आवड आहे. संयुक्त राष्ट्रांतील यूएईच्या स्थायी प्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमांच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. स्थायी प्रतिनिधी म्हणून ११ वर्षांचा कार्यकाळ २०२४ मध्ये पूर्ण केल्यानंतर त्यांची राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. आता महासचिवपदाची निवडणूक लढवण्यासाठी त्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहेत.

मात्र, संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवपदापर्यंत पोहोचण्याचा नुसेइबेह यांचा मार्ग सोपा नसेल. या पदासाठीच्या अन्य उमेदवारांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेच्या (अंकटाड) प्रमुख रेबेका ग्रीनस्पॅन, गुयानाच्या माजी परराष्ट्रमंत्री कॅरोलिन रोड्रिग्स-बिर्केट आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे (आयएईए) महासंचालक राफेल ग्रोसी यांचाही समावेश आहे.अलीकडील अनौपचारिक मतदानात या तिन्ही उमेदवारांनाही किमान दोन स्थायी सदस्यांकडून नकारात्मक मते मिळाली आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या ८० वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत नऊ पुरुषांनी महासचिवपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे यंदा या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी एखाद्या महिलेकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande