
मेलबर्न , 22 ऑक्टोबर (हिं.स.) । ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज मेगन शट हिला मोठा धक्का बसला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने औषधांच्या वापराशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. या कारवाईमुळे ती न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यातून बाहेर झाली आहे.
मेगन शटने डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्या जाणाऱ्या औषधांच्या वापराबाबतच्या नियमांचे पालन केले नाही. या बंदीमुळे ती देशांतर्गत 'विमेन्स बिग बॅश लीग'च्या आगामी हंगामातील पहिल्या सामन्यातही खेळू शकणार नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका निवेदनात म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मेगन शटवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे, हे उल्लंघन 'स्पोर्ट्स सायन्स अँड स्पोर्ट्स मेडिसिन' मार्गदर्शक तत्त्वांनुसार औषधांच्या वापराबाबतच्या नियमांचे पालन न केल्यामुळे झाले आहे. ही घटना स्पर्धा सुरू नसताना घडली होती आणि याचा संबंध खेळातील कामगिरी सुधारण्यासाठी औषधांचा वापर करण्याशी नाही. दोन सामन्यांच्या या बंदीमध्ये सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटचा समावेश आहे. आम्ही मेगनला आवश्यक तो पाठिंबा देणे सुरू ठेवू आणि आमच्या खेळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येकाकडून अपेक्षित असलेले मानक आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून देऊ, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मेगन शटने ही बंदी त्वरित स्वीकारली असून, त्याबाबत एक निवेदनही जारी केले आहे. शट म्हणाली, मला देण्यात आलेली शिक्षा मी पूर्णपणे स्वीकारते आणि माझ्याकडून अपेक्षित असलेले मानक पाळण्यात अपयशी ठरल्याबद्दल मी माफी मागते.या घटनेमुळे जे लक्ष वेधले गेले, त्याबद्दल मी दिलगीर आहे आणि मला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे. ही घटना स्पर्धेबाहेर घडली असून तिचा खेळाच्या कामगिरीशी कोणताही संबंध नाही, तरीही 'स्पोर्ट्स सायन्स अँड स्पोर्ट्स मेडिसिन' मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची जबाबदारी माझी आहे, हे मला समजते. खेळाडूंना या मार्गदर्शक तत्त्वांबाबत नियमितपणे माहिती दिली जाते आणि मला त्यांचे पालन करायला हवे होते, असे तिने पुढे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे