असीम मुनीर यांनी स्वतःच्याच नागरिकांनाच ठरवले दहशतवादी; भारतावर केले आरोप
इस्लामाबाद, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तानमध्ये सध्या अनेक आघाड्यांवर हिंसक घटनांना उधाण आले आहे. एका बाजूला अफगाणिस्तानसोबत सीमावादावरून तणाव निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्येही अस्थिर परिस्थिती आहे. बलुचिस्तानमध्ये बलुच नागरिक
असीम मुनीर यांनी नागरिकांनाच ठरवले दहशतवादी;भारतावर  लोकांना पाठिंबा देत असल्याचा आरोप


इस्लामाबाद, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तानमध्ये सध्या अनेक आघाड्यांवर हिंसक घटनांना उधाण आले आहे. एका बाजूला अफगाणिस्तानसोबत सीमावादावरून तणाव निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्येही अस्थिर परिस्थिती आहे. बलुचिस्तानमध्ये बलुच नागरिक आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील परिस्थितीही अत्यंत तणावपूर्ण आणि अस्थिर बनली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी चिथावणीखोर विधान केले आहे. त्यांनी स्वतःच्याच देशातील नागरिकांना दहशतवादी ठरवण्यास सुरुवात केली असून, भारत या लोकांना पाठिंबा देत असल्याचा आरोपही केला आहे.

इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर) या पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस (सीडीएफ) असीम मुनीर यांनी पेशावर येथील लष्कराच्या कोअर मुख्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी विविध भागांमध्ये वाढत असलेली अशांतता, सीमेशी संबंधित प्रश्न आणि विशेषतः खैबर पख्तूनख्वा प्रांतात लष्करी तुकड्यांच्या तैनातीबाबत माहिती घेतली.

आयएसपीआरच्या निवेदनानुसार, मुनीर यांनी दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देण्याचा इशारा दिला. तसेच, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि संभाव्य धोक्यांचा प्रभावीपणे सामना करण्याचे निर्देश दिले. पाकिस्तान दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा निश्चितपणे पूर्णपणे पराभव करेल, असेही असीम मुनीर यांनी म्हटले.याच्या एक दिवस आधी सीडीएफ मुनीर यांनी गव्हर्नर हाऊसमध्ये आयोजित खैबर पख्तूनख्वा उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत सहभाग घेतला होता. या बैठकीत प्रांतातील एकूण सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या विकासाला पुन्हा गती देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे सांगितले होते.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. पाकिस्तानी अधिकाऱ्यांओनी केलेल्या कारवाईत स्थानिक नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील अलीकडील अशांततेमुळे या भागाचे इस्लामाबादसोबतचे बिघडलेले संबंध पुन्हा एकदा उघड झाले आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू असलेली आंदोलने, अटकसत्र आणि निर्बंध यांमुळे आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये हिंसक संघर्ष निर्माण झाला आहे. सरकारकडून वारंवार दूरसंचार आणि संपर्क यंत्रणा बंद करण्यात आल्या. आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला, त्यांना निदर्शने करण्यापासून रोखण्यात आले आणि मोठ्या प्रमाणावर लष्करी बळाचा वापर करण्यात आला.

वीजदर, महागाई आणि राजकीय प्रतिनिधित्वावरून आंदोलन

या संपूर्ण परिस्थितीत एक बाब स्पष्ट झाली आहे की, हा संघर्ष आणि नागरिकांमधील असंतोष केवळ एका कारणापुरता मर्यादित नाही. या आंदोलनाच्या केंद्रस्थानी संयुक्त अवामी कृती समिती (जेएएसी) आहे. व्यापारी, वाहतूकदार आणि नागरी समाजातील विविध संघटनांचा या आघाडीत समावेश आहे.वीजदर कमी करणे, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात आणणे, सरकारी सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि राजकीय प्रतिनिधित्वाचा योग्य वाटा मिळवणे अशा विविध मागण्यांसाठी हे सर्व गट एकत्र आले आहेत. या मागण्यांवरून सुरू झालेल्या आंदोलनाने आता तीव्र स्वरूप धारण केले असून, पाकिस्तानी सरकारसमोरील आव्हाने वाढली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande