
अंकारा, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।तुर्कियेच्या उत्तर भागात शुक्रवारी कोळशाच्या खाणीत झालेल्या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. खाणीत अडकलेल्या एका कामगारापर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी वैद्यकीय पथके आणि बचाव कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाणीत झालेल्या स्फोटामुळे तेथे काम करणाऱ्या दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य पाच कामगार जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे एक कामगार खाणीत अडकला असून त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांचे प्रयत्न सुरू आहेत.
खाणीत स्फोट झाल्यानंतर आत ऑक्सिजनचा पुरवठा सुरू ठेवणे हे बचाव पथकांसमोरील सर्वांत मोठे आव्हान असते. त्यामुळे बचावकार्य वेगाने सुरू आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील झोंगुलदाक प्रांतातील किलिमली शहरात ही दुर्घटना घडली. घटनास्थळी वैद्यकीय पथके आणि बचाव कर्मचारी मदतकार्यात गुंतले आहेत.
झोंगुलदाकचे राज्यपाल उस्मान हासिबेक्तासोग्लू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जखमी कामगारांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. अन्य एका जखमी कामगाराला उपचारांसाठी राजधानी अंकारा येथील रुग्णालयात हलवण्यात येत आहे.
दरम्यान, तुर्कियेमध्ये खाणींमध्ये दुर्घटना घडण्याच्या घटना वारंवार घडत असतात. देशातील सर्वांत भीषण खाण दुर्घटनांपैकी एक दुर्घटना २०१४ मध्ये घडली होती. पश्चिम तुर्कियेतील सोमा शहरातील कोळशाच्या खाणीत आग लागल्याने मोठी दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेत तब्बल ३०१ जणांचा मृत्यू झाला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode