तैवानला चांपी चक्रीवादळाचा कहर ;शाळा आणि कार्यालये बंद, शेकडो उड्डाणे रद्द
ताइपे, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।तैवानमध्ये ‘चांपी’ चक्रीवादळ धडकण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेण्यात येत आहे. ताशी १७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने शाळा आणि कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेकडो विमानांची उड्डाणे
तैवानला चांपी चक्रीवादळाचा तडाखा: २० शहरांमध्ये शटडाउन; शाळा आणि कार्यालये बंद, शेकडो उड्डाणे रद्द


ताइपे, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।तैवानमध्ये ‘चांपी’ चक्रीवादळ धडकण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेण्यात येत आहे. ताशी १७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने शाळा आणि कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेकडो विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. चक्रीवादळ तैवानच्या अगदी जवळ पोहोचले असून, त्याचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानाचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाकडून खबरदारीची पावले उचलली जात आहेत.

स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, ग्रेटर तैपेई, कीलुंग आणि ताओयुआन यांसह अनेक भागांमध्ये शुक्रवारी शाळा आणि कार्यालये बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण तैवानमधील युनलिन, चियायी, ताइनान, काओशुंग आणि पिंगतुंग येथेही बंद ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. पूर्व तैवानसह यिलान, हुआलिएन, पेंघू आणि लियानचियांग या बाह्य बेटांवरही बंदची घोषणा करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या भागांतील दैनंदिन कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.

तैवानच्या केंद्रीय हवामान प्रशासनाने (सीडब्ल्यूए) गुरुवारी चांपी चक्रीवादळ जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर इशारा जारी केला. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी जमिनीवरील भागांसाठीही चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत चक्रीवादळ तैवानमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत त्याचा प्रभाव जाणवू शकतो. त्यानंतर चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यावर जनजीवन पूर्वपदावर येण्याची अपेक्षा आहे.

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तैपेई शहरातील काही भागांत अवघ्या २४ तासांत २०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी समुद्रकिनारे आणि डोंगराळ भागांपासून दूर राहावे, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

चक्रीवादळाचा परिणाम तैवानमध्ये दिसू लागला आहे. चक्रीवादळ धडकण्यापूर्वीच १०० हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. प्रवाशांनी संबंधित विमान कंपन्यांकडून मिळणाऱ्या ताज्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या चक्रीवादळाचा प्रभाव शेजारील जपानपर्यंतही पोहोचला आहे. तेथील चार विमान कंपन्यांची १६० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे तैवानसह जपानमधील हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande