पाकिस्तानने भारताला उपदेश देऊ नये; अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर यूएनमध्ये भारताचा पाकिस्तानवर हल्लाबोल
नवी दिल्ली , 23 ऑक्टोबर (हिं.स.)।धार्मिक अल्पसंख्याकांशी होणाऱ्या वागणुकीवरून भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर जोरदार टीका केली. पाकिस्तान आपल्या देशातील दुर्बल घटकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरला आहे आणि उलट भारताला धार्मिक स्वातंत्र्य व अल्प
पाकिस्तानने भारताला उपदेश देऊ नये; अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर यूएनमध्ये भारताचा पाकिस्तानवर हल्लाबोल


नवी दिल्ली , 23 ऑक्टोबर (हिं.स.)।धार्मिक अल्पसंख्याकांशी होणाऱ्या वागणुकीवरून भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर जोरदार टीका केली. पाकिस्तान आपल्या देशातील दुर्बल घटकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरला आहे आणि उलट भारताला धार्मिक स्वातंत्र्य व अल्पसंख्याकांच्या हक्कांबाबत उपदेश देण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भारताने केला.

संयुक्त राष्ट्रांत धार्मिक स्वातंत्र्य आणि मृतदेह दफन करण्याच्या अधिकारावर विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेदरम्यान संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव भाविका मंगलानंदन यांनी कोरोना महामारीच्या काळातील धार्मिक भेदभावाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारांच्या अधिकारांचे समर्थन करण्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मंगलानंदन म्हणाल्या की, संबंधित अहवालात महामारीच्या काळात विकसनशील देशांमध्ये झालेल्या कथित भेदभावाचा मुद्दा मांडण्यात आला आहे; मात्र विकसित देशांमध्ये घडलेल्या अशाच घटनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.भारतीय प्रतिनिधींनी मानवी दुःखाचे राजकारण करण्याबाबत इशारा दिला. धार्मिक स्वातंत्र्याच्या कथित उल्लंघनाच्या घटनांकडे कोणताही भेदभाव न करता पाहिले पाहिजे. राजकीय हेतूने निवडक घटनांचा उल्लेख करून त्यांचे चित्रण करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारांच्या अधिकारासंदर्भातील अहवालावर प्रश्न उपस्थित करताना भारतीय राजनैतिक अधिकारी म्हणाल्या की, गुन्हेगारांचे अधिकार हे दहशतवादी हल्ल्यांतील पीडितांच्या अधिकारांपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरता कामा नयेत. त्या म्हणाल्या, “एक दहशतवादी केवळ निष्पाप लोकांची हत्या करत नाही, तर देशाच्या विचारसरणीलाही हानी पोहोचवतो.”

१९९९ मधील कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानच्या भूमिकेवर टीका करताना मंगलानंदन म्हणाल्या की, धार्मिक स्वातंत्र्य आणि मृतदेह दफन करण्याच्या अधिकारांबाबत पाकिस्तानची भूमिका अत्यंत विचित्र आहे. कारण, पाकिस्तानने स्वतःच्या मृत सैनिकांच्या पार्थिवांशीही अयोग्य वर्तन केले होते.

भारतीय राजनैतिक अधिकारी म्हणाल्या, “कारगिल युद्धादरम्यान आपल्या सैनिकांच्या पार्थिवांशी वाईट वर्तन करणारा देश आज निर्लज्जपणे श्रद्धा, धार्मिक स्वातंत्र्य आणि मृतदेह दफन करण्याच्या अधिकारांबाबत बोलत आहे, ही अत्यंत विचित्र बाब आहे.”

मंगलानंदन यांनी पाकिस्तानला भारतावर टीका करण्याऐवजी पाकव्याप्त जम्मू-काश्मीरकडे (पीओके) लक्ष देण्याचा सल्ला दिला. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीचा मुद्दा उपस्थित करत त्या म्हणाल्या, “पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची संख्या कमी होत आहे. स्वतःच्या अल्पसंख्याकांना संरक्षण देऊ न शकणाऱ्या देशाने भारताला उपदेश देऊ नये.” पाकिस्तानात हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयातील तज्ज्ञांनीही पाकिस्तानातील जबरदस्तीने विवाह लावून देणे आणि धर्मांतराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली होती. या घटनांचा सर्वाधिक फटका हिंदू आणि ख्रिश्चन समुदायांना बसत असल्याचेही तज्ज्ञांनी नमूद केले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande