
छत्रपती संभाजीनगर, २४ ऑक्टोबर (हिं.स.) : राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये दर्जेदार आणि विविध विषयांवरील ग्रंथ उपलब्ध करून देण्यासह वाचनसंस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या ५१ व्या ग्रंथभेट योजनेसाठी एकूण १ हजार १८३ ग्रंथांची निवड करण्यात आली आहे. या ग्रंथांची यादी महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड झालेल्या ग्रंथांबाबत सूचना, हरकती किंवा आक्षेप असल्यास ते ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत लेखी स्वरूपात सादर करावेत, असे आवाहन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त निधीतून ही योजना राबविण्यात येत आहे. सन २०२४ मध्ये प्रकाशित होऊन ग्रंथालय संचालनालयाला प्राप्त झालेल्या ग्रंथांमधून राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी १ हजार १८३ ग्रंथांची निवड केली आहे.
निवड झालेल्या ग्रंथांमध्ये मराठी भाषेतील ६८५, हिंदी भाषेतील २४६ आणि इंग्रजी भाषेतील २५२ ग्रंथांचा समावेश आहे. विविध भाषांतील साहित्य उपलब्ध होणार असल्याने सार्वजनिक ग्रंथालयांमधील ग्रंथसंपदा समृद्ध होण्यास आणि वाचकांना वैविध्यपूर्ण साहित्याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
ग्रंथालय संचालनालयाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, निवड झालेल्या सर्व ग्रंथांची यादी १६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नागरिक, लेखक, प्रकाशक आणि संबंधित घटकांच्या अवलोकनासाठी खुली ठेवण्यात आली आहे. ही यादी संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या योजनेअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या ग्रंथयादीतील ग्रंथांचे वितरण ग्रंथालय संचालनालयाच्या २५ टक्के ग्रंथसूटदरानुसार करणे बंधनकारक असल्याचेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
सूचना व हरकती कुठे सादर कराव्यात?
प्रसिद्ध केलेल्या ग्रंथयादीतील कोणत्याही ग्रंथाबाबत सूचना, हरकती किंवा आक्षेप असल्यास संबंधितांनी ते ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत लेखी स्वरूपात सादर करावेत. यासाठी पुढील संपर्क तपशील देण्यात आले आहेत.
टपालाचा पत्ता: ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई – ४०० ००१.
ई-मेल: director.dol@maharashtra.gov.in
दूरध्वनी: (०२२) २२६६४६३८ / २२६७१३३३
अधिकृत संकेतस्थळ: www.dol.maharashtra.gov.in
सूचना आणि हरकती कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष हस्तबटवड्याने किंवा टपालाद्वारे सादर करता येतील. तसेच अधिकृत ई-मेलवरही त्या पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
ग्रंथांच्या तपशिलातील त्रुटीही कळविता येणार
प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील ग्रंथाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव किंवा ग्रंथाची किंमत यामध्ये काही बदल अथवा दुरुस्ती आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतची माहितीही संचालनालयाला कळविता येणार आहे. ग्रंथयादीतील तपशील अचूक राहावेत आणि संबंधितांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळावी, या उद्देशाने सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. ३१ ऑक्टोबरनंतर प्राप्त होणाऱ्या सूचना, हरकती किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे लेखक, प्रकाशक, ग्रंथालय पदाधिकारी, ग्रंथप्रेमी आणि नागरिकांनी प्रसिद्ध केलेल्या ग्रंथयादीचे अवलोकन करून आवश्यक सूचना निर्धारित मुदतीत सादर कराव्यात, असे आवाहन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis