
लातूर, २४ ऑक्टोबर (हिं.स.) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महा विधी सेवा शिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्यात चोरीच्या गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेला ४ किलो ६१६ ग्रॅम चांदीचा मुद्देमाल मूळ मालकास परत करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संदीपकुमार सी. मोरे आणि न्यायमूर्ती सुशील एम. घोडेस्वार यांच्या हस्ते फिर्यादी शेख असगर चांदपाशा पटेल, रा. कव्हा, ता. जि. लातूर यांना हा मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला.
सावेवाडी येथील दिवाणजी मंगल कार्यालयात २४ ऑक्टोबर २०२६ रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या कायदेशीर समस्या सोडविण्यास मदत व्हावी तसेच पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचावा, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक २४९/२०२५ मधील हा मुद्देमाल आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) आणि ३३१(४) अन्वये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये चांदीचे ११७ घोडे आणि लहान-मोठे १९८ चांदीचे पाळणे, अशा एकूण ३१५ वस्तूंचा समावेश आहे. या सर्व वस्तूंचे एकूण वजन ४ किलो ६१६ ग्रॅम आहे.
या कार्यक्रमास लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारूका, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्यासह न्यायिक व प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महा विधी सेवा शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना कायदेशीर हक्कांची माहिती, विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन आणि योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादी शेख असगर चांदपाशा पटेल यांना दिलासा मिळाला.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis