
परभणी, २४ ऑक्टोबर (हिं.स.) : समाजासमोर प्रत्येक काळात विविध संकटे आणि आव्हाने उभी राहत असतात. मात्र, त्यांवर मात करण्याची शक्ती समाजातच असते. ही शक्ती जागृत करणे, समाजाला संघटित करणे आणि राष्ट्रहितासाठी सज्ज करणे, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आहे, असे प्रतिपादन संघाचे सहसरकार्यवाह आलोक कुमार यांनी केले.
परभणी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी वसमत रस्त्यावरील कल्याण नगरातील प्रांगणात आयोजित विजयादशमी उत्सवात ते बोलत होते. यावेळी बियाणे अॅग्रो इंडस्ट्रीजचे उद्योजक अविनाश बियाणी, संघाचे विभाग संघचालक डॉ. रामेश्वर नाईक, जिल्हा संघचालक मुकुंद चौधरी आणि शहर संघचालक माऊली शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.
सामाजिक एकजूट ही काळाची गरज
समाजातील विविध क्षेत्रांत निर्माण होणाऱ्या दुर्गुणांविरोधात लढण्याची शक्ती समाजातच निर्माण झाली पाहिजे. सामाजिक, धार्मिक आणि अन्य क्षेत्रांतील नकारात्मक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी समाजाने संघटित होणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने स्वयंस्फूर्तीने एकत्र यावे, संकटाच्या काळात एकमेकांच्या मदतीला धावून जावे आणि राष्ट्राच्या उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन आलोक कुमार यांनी केले.
समाजात सामूहिक शक्ती निर्माण झाल्यास कोणत्याही संकटाचा सामना करता येतो. यासाठी सामाजिक एकजूट, परस्पर सहकार्य आणि सामूहिक जबाबदारीची भावना महत्त्वाची आहे. समाजात धार्मिक तसेच अन्य क्षेत्रांत जनजागृतीचे कार्य सुरू असून, हे कार्य निरंतर चालू राहण्यासाठी संघटन अधिक भक्कम होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
धार्मिक आणि सामाजिक जनजागृतीवर भर
देशातील सद्यस्थितीविषयी बोलताना आलोक कुमार यांनी अलीकडील वर्षांत देशाचा जागतिक स्तरावरील सन्मान वाढल्याचे आणि सनातन हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनाला चालना मिळाल्याचे मत व्यक्त केले. तीर्थक्षेत्रांमध्ये भाविकांची वाढती गर्दी, योगाविषयी निर्माण झालेली जनजागृती, धार्मिक पुस्तकांची वाढती मागणी, मंदिरांचे पुनरुज्जीवन आणि विविध उत्सवांमधील उत्साह ही सकारात्मक प्रयत्नांची फलश्रुती असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, देशाची प्रगती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवन यांच्याबाबत काही शक्तींकडून विरोधी वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशाची प्रतिमा मलिन करणे, धार्मिक श्रद्धा आणि परंपरांवर आघात करणे तसेच आंदोलनांच्या माध्यमातून अस्थैर्य निर्माण करण्याचे प्रयत्न समाजाने ओळखले पाहिजेत, असे ते म्हणाले.
अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीवही आवश्यक
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला अधिकार दिले आहेत. मात्र, अधिकारांबाबत जागरूकता वाढत असताना संविधानाने अधोरेखित केलेल्या कर्तव्यांकडेही तितकेच लक्ष देणे आवश्यक आहे, असे आलोक कुमार यांनी सांगितले. अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीव, समाजाप्रती समर्पणाची भावना आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
समाजात संयम, समरसता आणि सद्भावना टिकून राहण्यासाठी संघाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.समाजातील सुप्त शक्ती जागृत करून राष्ट्रहितासाठी कार्य करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. समर्थ समाज, सजग नागरिक आणि सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान द्यावे, असा संदेश या विजयादशमी उत्सवातून देण्यात आला.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis