
लातूर, 24 ऑक्टोबर (हिं.स.)।
दुष्काळी परिस्थितीतील संभाव्य समस्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे मार्गदर्शन; पशुधन, शेती अवजारे व विद्युत मोटारींच्या चोरीपासून सावध राहण्याचे आवाहन
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या संभाव्य समस्या जाणून घेऊन त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ पासून संपूर्ण जिल्ह्यात ‘पोलीस आपल्या गावामध्ये’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कासार शिरशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हासुरी येथे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी ग्रामभेट देऊन सुमारे ५० ते ६० नागरिकांशी संवाद साधला आणि विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेणे, दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण होऊ शकणाऱ्या समस्यांवर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि पोलीस व नागरिकांमधील समन्वय अधिक दृढ करणे हा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस अधिकारी गावोगावी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत.
हासुरी येथे झालेल्या ग्रामभेटी दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दुष्काळी परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी, संभाव्य समस्या आणि त्यावर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. पाणीटंचाईच्या काळात ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाताना नागरिकांनी सतर्क राहावे तसेच कोणतीही समस्या निर्माण झाल्यास पोलिसांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
पशुधन व शेती साहित्याच्या चोरीपासून सावध राहण्याचे आवाहन
ग्रामीण भागात पशुधन चोरी, शेतातील शेती अवजारे तसेच विद्युत मोटारींची चोरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. गावातील नागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा, संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी आणि गावाच्या सुरक्षिततेसाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच गावातील नागरिकांच्या सहभागातून ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करून गावाच्या सुरक्षिततेसाठी सामूहिक जबाबदारी पार पाडण्याचे महत्त्व विशद करण्यात आले. ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून गावातील सुरक्षिततेवर लक्ष ठेवण्यास आणि संभाव्य गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते, असे सांगण्यात आले.
अवैध सावकारी व सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती
यावेळी अवैध सावकारीच्या समस्येबाबतही नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अवैध सावकारीच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक शोषणाबाबत नागरिकांनी जागरूक राहावे आणि अशा प्रकारांना बळी पडल्यास संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले.
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन आर्थिक फसवणूक, अनोळखी लिंक, संशयास्पद फोन कॉल आणि डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबतही माहिती देण्यात आली. नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सायबर सुरक्षा विषयक पोस्टरचे वाटप करण्यात आले.
पोलीस आणि नागरिकांमधील समन्वयातून समस्यांवर मात
दुष्काळी परिस्थितीत निर्माण होणाऱ्या सामाजिक व कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित संभाव्य समस्यांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी पोलीस आणि नागरिक यांच्यातील परस्पर विश्वास व समन्वय महत्त्वाचा आहे. नागरिकांनी आपल्या समस्या पोलिसांसमोर मांडाव्यात आणि पोलिसांनीही नागरिकांशी नियमित संवाद साधून त्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे, या भूमिकेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis