
चंद्रपूर, 24 ऑक्टोबर (हिं.स.)।
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह–गोंदिया रेल्वेमार्गावरील मामला वनपरिक्षेत्रांतर्गत कक्ष क्रमांक ४१८ मध्ये रेल्वे अपघातात एका मादी बिबट्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे या रेल्वेमार्गावरील बिबट्यांच्या रेल्वे अपघातातील मृत्यूंची संख्या आठवर पोहोचली असून, एकूण वन्यजीव मृत्यूंची संख्या १४० च्या पुढे गेली आहे.
बल्लारशाह–गोंदिया हा रेल्वेमार्ग कावल–ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण वन्यजीव भ्रमणमार्गाचा भाग असून, वाघ, बिबटे, अस्वल आणि इतर वन्यप्राण्यांच्या सुरक्षित हालचालींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, या मार्गावर वारंवार होणाऱ्या रेल्वे अपघा तांमुळे वन्यजीवांच्या अस्तित्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच 'हॅबिटॅट कन्झर्व्हेशन सोसायटी'च्या पथकाने घटनास्थळी पोहोचून प्रत्यक्ष पाहणी व शहानिशा केली. मृत बिबट्या हा अंदाजे सहा महिन्यांचा असल्याची माहिती संस्थेच्या पथकाने दिली. या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षित भ्रमणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
घटनास्थळी हॅबिटॅट कन्झर्व्हेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे, अमित देशमुख, नाजिश अली, अभिषेक गजबे, जितेंद्र नोमुलवार, रणजित मडावी, कार्तिक दरणे, वनविकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी, रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी उपस्थित होते.
या रेल्वेमार्गावर सातत्याने होणारे वन्यजीवांचे मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे विभाग व वन विभागाने समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. रेल्वेचा वेग नियंत्रित करणे, संवेदनशील ठिकाणांची ओळख करून प्रभावी वन्यजीव संरक्षण उपाययोजना राबवणे आणि नियमित निरीक्षण वाढवणे ही काळाची गरज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव