स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी २७ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत
छत्रपती संभाजीनगर, 24 ऑक्टोबर, (हिं.स.)। उच्च शिक्षण घेण्याची जिद्द असूनही आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात अडथळे येऊ नयेत,यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आधार देणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सन २०२६
स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी २७ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत


छत्रपती संभाजीनगर, 24 ऑक्टोबर, (हिं.स.)। उच्च शिक्षण घेण्याची जिद्द असूनही आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात अडथळे येऊ नयेत,यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आधार देणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील नूतनीकरण अर्जांची पडताळणी करण्यात आली आहे.

प्राप्त झालेल्या एकूण ८४९ अर्जांपैकी ११८ विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या असून,१२९ विद्यार्थ्यांनी अद्याप अर्जाची हार्डकॉपी व आवश्यक कागदपत्रे समाज कल्याण कार्यालयात जमा केलेली नाहीत.अशा विद्यार्थ्यांनी २७ ऑक्टोबर २०२६ पूर्वी अर्जातील त्रुटींची पूर्तता करून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.अन्यथा संबंधित अर्ज अपात्र ठरविण्यात येतील,असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी कळविले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळावा,या उद्देशाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या तसेच वसतिगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज करूनही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. यामध्ये इयत्ता अकरावी,बारावी तसेच व्यावसायिक व बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये,तसेच आर्थिक अडचणींमुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये,यासाठी या योजनेच्या माध्यमातून भोजन भत्ता,निवास भत्ता आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.या सहाय्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निवास,भोजन व शिक्षणासाठी आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेता येतात.

विशेष म्हणजे,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक २६ डिसेंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, तालुकास्तरावर शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनाही ही योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी स्वाधार योजनेअंतर्गत नूतनीकरणासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार प्राप्त झालेल्या एकूण ८४९ अर्जांची पडताळणी समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आली. या पडताळणीत ११८ विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये विविध त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे.तसेच १२९ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रणालीवर भरलेल्या अर्जाची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रांचा संच म्हणजेच अर्जाची हार्डकॉपी अद्याप समाज कल्याण कार्यालयात जमा केलेली नाही.

या विद्यार्थ्यांना अर्जातील त्रुटी दूर करण्याबाबत तसेच आवश्यक कागदपत्रे कार्यालयात जमा करण्याबाबत वेळोवेळी भ्रमणध्वनी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत.मात्र, वारंवार सूचना देऊनही संबंधित विद्यार्थ्यांकडून अद्याप त्रुटींची पूर्तता करण्यात आलेली नाही. तसेच काही विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रेही कार्यालयात सादर केलेली नाहीत.

या पार्श्वभूमीवर संबंधित विद्यार्थ्यांना त्रुटीपूर्तता करण्यासाठी आणि अर्जाची हार्डकॉपी सादर करण्यासाठी २७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आहेत,त्यांनी त्या तातडीने दूर कराव्यात.तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरला आहे,मात्र अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रांचा संच अद्याप जमा केलेला नाही,त्यांनी तो समाज कल्याण कार्यालय,धाराशिव येथे विहित मुदतीपूर्वी जमा करावा.

स्वाधार योजना ही आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण आधार ठरत आहे.त्यामुळे केवळ अर्जातील त्रुटी किंवा आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर न केल्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये,यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी मुदतीचे गांभीर्य ओळखून आवश्यक कार्यवाही पूर्ण करणे गरजेचे आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande