कायरन पोलार्डची मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती
मुंबई, 24 ऑक्टोबर (हिं.स.)मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२७ च्या पार्श्वभूमीवर कायरन पोलार्डची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. २०२३ च्या हंगामापूर्वी आयपीएलमधून निवृत्त झाल्यानंतर, पोलार्ड गेल्या चार हंगामांपासून संघाचा फलंदाजी प्रशिक्षक
कायरन पोलार्ड


मुंबई, 24 ऑक्टोबर (हिं.स.)मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२७ च्या पार्श्वभूमीवर कायरन पोलार्डची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. २०२३ च्या हंगामापूर्वी आयपीएलमधून निवृत्त झाल्यानंतर, पोलार्ड गेल्या चार हंगामांपासून संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत होता. तो महेला जयवर्धनेची जागा घेणार आहे.

पोलार्डचा मुंबई इंडियन्स आणि त्यांच्याशी संबंधित इतर फ्रँचायझींशी दीर्घकाळ संबंध राहिला आहे. २०१० च्या हंगामापूर्वी तो पहिल्यांदा क्रिकेटपटू म्हणून संघात सामील झाला होता. मुंबई इंडियन्सने जिंकलेल्या पाच आयपीएल विजेतेपदांमध्ये (२०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२०) तो संघाचा महत्त्वाचा भाग होता. याव्यतिरिक्त, २०११ आणि २०१३ मध्ये जिंकलेल्या दोन सीएलटी२० विजेतेपदांमध्येही त्याचा सहभाग होता. आयपीएलमध्ये त्याचा रेकॉर्ड अतिशय प्रभावी आहे; त्याने १८९ सामन्यांत १४७.३२ च्या स्ट्राईक रेटने ३४१२ धावा केल्या आहेत आणि ६९ बळीही घेतले आहेत. २०२२ च्या हंगामापर्यंत तो क्रिकटपटू म्हणून खेळला, त्यानंतर त्याने फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली आणि आता त्याला मुख्य प्रशिक्षकपदावर बढती देण्यात आली आहे.

कायरन पोलार्ड म्हणाला, मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मुंबई इंडियन्स माझ्या आयुष्याचा आणि कारकिर्दीचा एक मोठा भाग राहिले आहेत. या संघासोबत, क्रिकेटपटूंसोबत आणि क्रिकेटप्रेमींसोबत माझे जे नाते आहे, ते माझ्यासाठी खूप मोलाचे आहे. क्रिकेटपटू आणि त्यानंतर प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिकांतून हा प्रवास अनुभवल्यामुळे, मुंबई इंडियन्सची मूल्ये काय आहेत आणि 'ब्लू अँड गोल्ड' जर्सीचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी किती मोठी असते, हे मला चांगले ठाऊक आहे. मी क्रिकटपटू आणि सपोर्ट स्टाफसोबत मिळून काम करण्यास उत्सुक आहे. संघाचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि आमच्या प्रतिभावान क्रिेकेटपटूंना घडवण्यासाठी मी प्रयत्नशील असेन.

याव्यतिरिक्त, पोलार्ड गेल्या काही वर्षांत एमएलसी, आयएलटी२० आणि एसए२० मधील मुंबई इंडियन्सच्या इतर फ्रँचायझींशीही क्रिकेटपटू म्हणून जोडलेला राहिला आहे. पोलार्ड अजूनही फ्रँचायझी क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. यावर्षी त्यांनी एमएलसीमध्ये 'एमआय न्यूयॉर्क' आणि सीपीएलमध्ये 'ट्रिनबागो नाईट रायडर्स' कडून खेळले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, २०२७ च्या हंगामासाठी 'एसए२०' क्रिकेटपटूंच्या लिलावात त्यांना 'जोबर्ग सुपर किंग्स' संघाने करारबद्ध केले. 'एमआय'चे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती ही या भूमिकेतील त्यांची पहिलीच जबाबदारी आहे.

संघाच्या मालक नीता अंबानी म्हणाल्या, पोलार्ड वयाच्या २२ व्या वर्षी 'मुंबई इंडियन्स'मध्ये सामील झाला होता आणि गेल्या सोळा वर्षांत तो आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. खेळाडू म्हणून त्याने आम्हाला अनेक अविस्मरणीय क्षण दिले आहेत, तर प्रशिक्षक म्हणूनही तो आपला अनुभव, आवड आणि खेळाची सखोल समज आमच्यासोबत शेअर करत आहे.

त्या पुढे म्हणाल्या, 'पॉली'ला 'एमआय'ची जर्सी परिधान करण्याचा अर्थ काय असतो आणि 'पलटन'साठी खेळण्यासाठी कशाची गरज असते, हे चांगले ठाऊक आहे. मला खात्री आहे की, तो या नवीन भूमिकेतही तितकीच वचनबद्धता, विश्वास आणि दृढनिश्चय घेऊन येईल. संघाच्या पुढील प्रवासाचे नेतृत्व करताना त्याला खूप खूप शुभेच्छा!

प्रशिक्षक म्हणून पोलार्ड यांच्यासमोरील पहिले काम म्हणजे डिसेंबर महिन्यात गोव्यात होणाऱ्या क्रिकेटपटूंच्या लिलावापूर्वी, संघात कायम ठेवल्या जाणाऱ्या क्रिकेटपटूंची यादी निश्चित करणे असणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande