न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटीत भारतीय 'अ' संघाच्या फलंदाजांकडून निराशा
लिंकन (न्यूझीलंड), 24 ऑक्टोबर, (हिं.स.) - लिंकन येथील बर्ट सटक्लिफ ओव्हलवर सुरू असलेल्या पहिल्या अनधिकृत कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंड ''अ'' संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली. त्यांनी भारत ''अ'' संघाला ११३ धावांत सर्वबाद केले आणि दिवस
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटीत भारतीय 'अ' संघाच्या फलंदाजांकडून निराशा


लिंकन (न्यूझीलंड), 24 ऑक्टोबर, (हिं.स.) - लिंकन येथील बर्ट सटक्लिफ ओव्हलवर सुरू असलेल्या पहिल्या अनधिकृत कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंड 'अ' संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली. त्यांनी भारत 'अ' संघाला ११३ धावांत सर्वबाद केले आणि दिवसाच्या अखेरीस ३ बाद १३५ धावा करत २२ धावांची आघाडी घेतली.

भारत 'अ' संघाच्या फलंदाजांची न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर चांगलीच दमछाक झाली. सायमन कीनने पाच बळी घेतले, तर झॅक गिब्सनने तीन गडी बाद केले. प्रत्युत्तरात, न्यूझीलंड 'अ' संघाला सलामीवीर रिस मारियू आणि कर्टिस हीफी यांनी दमदार सुरुवात करून दिली; या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी केली. ३९ व्या षटकात मुकेश चौधरीने ही भागीदारी तोडली आणि मारियूला बाद केले. मारियूने ११७ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने ७६ धावा केल्या. त्यानंतरच्या षटकात आकिब नबीने सलग दोन चेंडूंवर जेडेन लेनॉक्स आणि टिम रॉबिन्सन यांना बाद करून न्यूझीलंड 'अ' संघाची स्थिती ३ बाद १३२ अशी केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा हीफी ३७ धावांवर, तर मॅथ्यू बॉयल १ धावेवर नाबाद होते. न्यूझीलंड 'अ' संघाने ४१ षटकांत ३ बाद १३५ धावा केल्या आहेत.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारत 'अ' संघाच्या फलंदाजांना न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करता आला नाही. तिसऱ्या षटकात के.एल. राहुल आठ चेंडू खेळूनही खाते न उघडताच बाद झाला. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३० धावा जोडल्या. गिब्सनने जैस्वालला बॉयलच्या हाती झेल देण्यास भाग पाडून ही भागीदारी तोडली. जैस्वालने १७ धावा केल्या. साई सुदर्शनही खाते न उघडताच बाद झाला; त्याला कीनने गोलंदाजी करून तंबूत धाडले. भारत 'अ' संघाचा कर्णधार ध्रुव जुरेलही स्वस्तात बाद झाला; त्याने १ धाव केली आणि तो कीनच्या गोलंदाजीवर मारियूच्या हाती झेल देऊन परतला.

पडिक्कलने यश राठोडसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण गिब्सनने या डावखुऱ्या फलंदाजाला ३२ धावांवर बाद केले. पडिक्कलच्या खेळीत पाच चौकारांचा समावेश होता. गिब्सनने आपल्या पुढच्या षटकात वॉशिंग्टन सुंदरला शून्यावर बाद केले, ज्यामुळे 'इंडिया ए' संघ अधिक अडचणीत सापडला.

राठोड आणि अंशुल कंबोज यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण ख्रिस्टियन क्लार्कने कंबोजला १० धावांवर बाद करून त्यांची भागीदारी तोडली. त्यानंतर राठोडने तळाच्या फलंदाजांच्या साथीने आक्रमक पवित्रा घेत काही चौकार लगावले आणि 'इंडिया ए'ला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला.

कीनने आकिब नबी, आकाश दीप आणि मुकेश चौधरी यांना बाद करून आपला पाच बळी घेतले आणि डाव संपवला. राठोड ४४ धावांवर नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि तीन षटकार लगावले. भारताचा संघ ११३ धावांत बाद झाला. न्यूझीलंड 'ए'कडून गिब्सनने तीन बळी घेतले, तर क्लार्क आणि फ्रेझर शीट यांनी प्रत्येकी एक बळी मिळवून कीनच्या प्रभावी गोलंदाजीला साथ दिली. भारत 'अ'संघ न्यूझीलंड 'अ'विरुद्ध तीन चार-दिवसीय अनधिकृत कसोटी सामने खेळणार आहे. दुसरा सामना ३१ ऑक्टोबरपासून हॅगली ओव्हल येथे सुरू होईल, तर तिसरा सामना ७ नोव्हेंबरपासून लिंकन येथे खेळवला जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande