छ. संभाजीनगर - २७ ऑक्टोबरला राष्ट्रीय जंतनाशक मोहीम
छत्रपती संभाजीनगर, 24 ऑक्टोबर, (हिं.स.)। बालकांचे निरोगी बालपण, सुदृढ आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाला विशेष महत्त्व आहे. आतड्यांतील जंतांच्या संसर्गामुळे बालकांमध्ये निर्माण होणारा रक्तक्षय,अशक्तपणा आणि क
छ. संभाजीनगर - २७ ऑक्टोबरला राष्ट्रीय जंतनाशक मोहीम


छत्रपती संभाजीनगर, 24 ऑक्टोबर, (हिं.स.)। बालकांचे निरोगी बालपण, सुदृढ आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाला विशेष महत्त्व आहे. आतड्यांतील जंतांच्या संसर्गामुळे बालकांमध्ये निर्माण होणारा रक्तक्षय,अशक्तपणा आणि कुपोषणाचा धोका कमी करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व पात्र बालकांना आणि किशोरवयीन मुला-मुलींना शाळा,अंगणवाडी केंद्रे आणि आरोग्य संस्थांच्या माध्यमातून जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत.मोहिमेच्या मुख्य दिवशी औषध घेऊ न शकलेल्या पात्र बालकांसाठी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात आला आहे.

बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांच्यातील रक्तक्षयाचे प्रमाण कमी व्हावे,शारीरिक वाढ योग्य प्रकारे व्हावी आणि बौद्धिक विकासाला चालना मिळावी,या उद्देशाने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे.जिल्ह्यातील एकही पात्र बालक या मोहिमेपासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभाग,शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभाग यांच्या समन्वयातून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

लहान मुले आणि किशोरवयीन मुला-मुलींमध्ये आतड्यांतील जंतांचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.जंतांच्या संसर्गामुळे शरीराला आवश्यक असलेल्या पोषक घटकांचे शोषण कमी होते. परिणामी,रक्तक्षय,अशक्तपणा, भूक मंदावणे आणि शारीरिक वाढ खुंटणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.याचा बालकांच्या बौद्धिक विकासावर,एकाग्रतेवर आणि शैक्षणिक प्रगतीवरही परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे बालकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी नियमित जंतनाशक औषधोपचार महत्त्वाचे ठरतात.

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व पात्र बालकांना आणि किशोरवयीन मुला-मुलींना जंतनाशक औषधांचा लाभ देण्यात येणार आहे.शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये,तर अंगणवाडीत नोंदणीकृत बालकांना संबंधित अंगणवाडी केंद्रांमध्ये औषध देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.त्याचबरोबर शाळेत किंवा अंगणवाडीत न जाणाऱ्या पात्र बालकांनाही मोहिमेचा लाभ मिळावा,यासाठी आरोग्य संस्थांच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभाग यांच्या समन्वयातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे.शिक्षक,अंगणवाडी सेविका,आरोग्य कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांच्या सहभागातून मोहिमेची माहिती पालकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून, जंतनाशक औषधोपचाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.

जंतनाशक औषधोपचारामुळे आतड्यांतील जंतांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटकांचे शोषण सुधारण्यास हातभार लागतो.परिणामी, बालकांचे आरोग्य सुधारण्यास, शारीरिक वाढीस आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होऊ शकते. बालकांची शैक्षणिक प्रगती, एकाग्रता आणि बौद्धिक विकासासाठी त्यांचे आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे.त्यामुळे पालकांनी या मोहिमेचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या पाल्यांना जंतनाशक औषधांचा लाभ मिळवून द्यावा,असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

विशेष म्हणजे,२७ ऑक्टोबर रोजी मोहिमेच्या मुख्य दिवशी काही कारणास्तव जंतनाशक गोळी घेऊ न शकलेल्या पात्र बालकांसाठी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात आला आहे.एखाद्या बालकाला आजारपण किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असल्यास औषध देण्यापूर्वी संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांचा सल्ला घ्यावा. आजारपणामुळे किंवा इतर कारणांमुळे मुख्य दिवशी औषध घेणे शक्य न झाल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार ३ नोव्हेंबर रोजी संबंधित शाळा, अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य संस्थेत जंतनाशक गोळी देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व पालकांनी २७ ऑक्टोबर रोजी आपल्या पाल्यांना शाळा,अंगणवाडी किंवा संबंधित आरोग्य संस्थेत उपस्थित ठेवून राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत सहभागी करून घ्यावे.शिक्षक, अंगणवाडी सेविका,आरोग्य कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांनी पात्र लाभार्थ्यांपर्यंत मोहिमेची माहिती पोहोचवावी.तसेच जंतनाशक औषधोपचाराचे महत्त्व समजावून सांगून पालकांमध्ये जनजागृती करावी.जंतनाशक औषधांचा लाभ आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या वयोगटानुसार आणि मार्गदर्शक सूचनांनुसारच घ्यावा.औषध देताना संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande