रोमहर्षक लढतीत भारताची न्यूझीलंडवर मात, तिलक वर्मा विजयाचा शिल्पकार
क्राइस्टचर्च (न्यूझीलंड), 24 ऑक्टोबर (हिं.स.)तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडकडून विजय खेचून आणला. दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार गडी राखून पराभूत करत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.प्र
तिलक वर्मा आणि नितिश कुमार रेड्डी


क्राइस्टचर्च (न्यूझीलंड), 24 ऑक्टोबर (हिं.स.)तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडकडून विजय खेचून आणला. दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार गडी राखून पराभूत करत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.प्रथम फलंदाजी करताना, फिलिप्स आणि जेकब्स यांच्या दमदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने भारतासमोर १८१ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, तिलक आणि नितीश रेड्डी यांच्या नाबाद भागीदारीच्या जोरावर भारताने १९.५ षटकांतच हे लक्ष्य पूर्ण केले.

किवींनी ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने आश्वासक सुरुवात केली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी रचली. पण संजू १७ चेंडूंमध्ये केवळ १४ धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला वैभव सूर्यवंशीही फार काही करू शकला नाही. तो केवळ चार धावांवर बाद झाला. त्यानंतर मिचेल सँटनरने आपल्या फिरकीची जादू दाखवली. सँटनरने धोकादायक अभिषेक शर्माला बाद केले. अभिषेकने तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २७ धावा केल्या. त्यानंतर सँटनरने कर्णधार श्रेयस अय्यरला बाद केले.त्याने अक्षर पटेल आणि नमन धीर यांनाही बाद केले, ज्यांनी मागील सामन्यात भारताला विजय मिळवून दिला होता. धीरने १७ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या. सँटनरने चार षटकांत २१ धावा देऊन चार बळी घेतले.

भारताची अवस्था १४.५ षटकांत ११२/६ अशी झाली होती. सामना जिंकण्यासाठी भारताला ३१ चेंडूंमध्ये ६९ धावांची गरज होती. त्यानंतर तिलक आणि रेड्डी यांनी भारताची आणखी पडझड होऊ दिली नाही. सँटनरच्या दमदार गोलंदाजीनंतर, टीम इंडिया सामना गमावणाप असे वाटत होते. पण तिलक वर्मा आणि रेड्डी यांनी सूत्रे हाती घेतली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ३० चेंडूंमध्ये नाबाद ६९ धावांची भागीदारी केली. तिलकने सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २६ चेंडूंमध्ये नाबाद ५१ धावा केल्या. रेड्डी १३ चेंडूंमध्ये २६ धावा करून नाबाद राहिले. भारताने एक चेंडू शिल्लक असताना हा रोमांचक सामना जिंकला. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

तत्पूर्वी, ग्लेन फिलिप्स आणि जेकब्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकांत ५ गडी गमावून १८० धावा केल्या. अर्शदीपने टीम इंडियासाठी दोन बळी घेत, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनण्याचा मान मिळवला. या सामन्यात न्यूझीलंडकडून फिलिप्सने ७० धावा, तर जेकब्सने ५८ धावा केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande