
लातूर, 25 ऑक्टोबर (हिं.स.)।
‘वाचाल तर वाचाल’, ‘विद्येविना मती गेली’ या म्हणी व सुभाषितांमधून शिक्षण, ज्ञान आणि वाचनाचे महत्त्व अधोरेखित होते. आजच्या डिजिटल युगात मोबाईलच्या पडद्यावर रमणाऱ्या बालमनांना पुस्तकांच्या पानांशी मैत्री करायला लावणे हे मोठे आव्हान बनले आहे. मात्र, ‘इच्छा तेथे मार्ग’ या उक्तीप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देऊन त्यांच्या कल्पनाशक्तीला पंख देण्याचे काम ‘रीड लातूर’ या उपक्रमातून सुरू आहे. चित्रपट निर्मात्या आणि वाचनप्रेमी दीपशिखा धिरज देशमुख यांच्या संकल्पनेतून आणि धिरज देशमुख यांच्या सहकार्याने साकारलेल्या या उपक्रमाने लातूर जिल्ह्यातील १५० जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत वाचनाचे विश्व पोहोचविले आहे. जवळपास सहा हजार पुस्तकांच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वाचा विस्तार करण्याचा हा प्रयत्न खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे.
‘ज्ञान हीच खरी संपत्ती’ असे म्हटले जाते. पैसा खर्च केल्याने कमी होतो; मात्र ज्ञान वाटल्याने वाढते. पुस्तक हे या ज्ञानसंपत्तीचे खुले भांडार आहे. पुस्तकांच्या सहवासातून मुलांना नवे विचार, नवे अनुभव आणि नव्या जगाची ओळख होते. त्यामुळेच मुलांच्या हातात पुस्तक देणे म्हणजे त्यांच्या भविष्याच्या पायाभरणीत मोलाची भर घालणे होय.
‘रीड लातूर’ या उपक्रमामागेही हाच विचार आहे. शालेय पाठ्यपुस्तकांपुरते विद्यार्थ्यांचे वाचन मर्यादित न राहता त्यांना गोष्टी, साहसकथा, चरित्रे, दंतकथा आणि विविध विषयांवरील साहित्य वाचण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधील पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य विकसित करण्याबरोबरच वेगवेगळ्या संस्कृती, विचार आणि अनुभवांची ओळख होत आहे.
आजवर लातूर जिल्ह्यातील जवळपास १५० जिल्हा परिषद शाळांमध्ये सहा हजार पुस्तके पोहोचविण्यात आली आहेत. त्यातून सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत वाचनाची गोडी पोहोचविण्याचा प्रयत्न झाला आहे. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीप्रमाणे दररोज थोडेसे वाचन करण्याची सवय भविष्यात ज्ञानाचा मोठा साठा निर्माण करू शकते.
बालपणी मनावर उमटलेले संस्कार आयुष्यभर सोबत राहतात. ‘लहानपण देगा देवा’ असे म्हणताना बालवयातील अनुभवांचे महत्त्व अधोरेखित होते. या वयात वाचलेली पुस्तके मुलांच्या विचारविश्वाला आकार देतात, कल्पनाशक्तीला चालना देतात आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करतात. दीपशिखा देशमुख यांनाही बालपणीच्या वाचनाने समृद्ध केले. ‘अमर चित्र कथा’, ‘नॅन्सी ड्र्यू’ आणि ‘द अॅडव्हेंचर्स ऑफ द फेमस फाइव्ह’ यांसारख्या पुस्तकांनी त्यांच्या बालविश्वात साहस, कुतूहल, रहस्य आणि कल्पनाशक्तीची भर घातली. या पुस्तकांतून मिळालेला आनंद ग्रामीण भागातील मुलांनाही अनुभवता यावा, या भावनेतून ‘रीड लातूर’ची संकल्पना पुढे आली.
लातूर हे त्यांचे सासर असल्याने येथील मुलांसाठी काहीतरी अर्थपूर्ण आणि दीर्घकालीन योगदान द्यावे, अशी त्यांची इच्छा होती. पती धिरज देशमुख यांच्या सहकार्याने या इच्छेला कृतीचे स्वरूप मिळाले. ‘पेराल तसे उगवेल’ या उक्तीप्रमाणे आज मुलांच्या मनात पुस्तकांविषयी प्रेमाची बीजे पेरली जात आहेत. उद्या याच बीजांचे रूपांतर जिज्ञासू, संवेदनशील आणि विचारशील पिढीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करता येते.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis