नाशकात लग्न मंडपात थेट वऱ्हाड्यांवर डिझेल ओतून पेटवण्याचा प्रयत्न
Attempt to set fire to the wedding tent by pouring diesel directly on the grooms;
Attempt to set fire to the


प्रेमविवाहाच्या रागातून मुलीकडच्यांचा हल्ला; महिला, मुलांवर फेकले डिझेल; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी

नाशिकच्या येवल्यातील धक्कादायक प्रकार

येवला, 25 ऑक्टोबर (हिं.स.)।

प्रेमविवाहाचा राग मनात धरून सुरू असलेल्या लग्न सोहळ्यात मुलीकडच्या नातेवाइकांनी थेट लग्न मंडपात घुसून वऱ्हाडी, लहान मुले आणि महिलांवर डिझेल ओतून त्यांना जिवंत पेटवून देण्याचा थरारक प्रकार येवला शहरात उघडकीस आला आहे. या घटनेनंतर दोन्ही बाजूंच्या नातेवाइकांत तुंबळ हाणामारी झाली असून, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी येवला शहर पोलिसांनी तत्परता दाखवत १० ते १२ जणांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण आणि तरुणीने सुमारे दोन महिन्यांपूर्वी घरातून पळून जाऊन कायदेशीररीत्या कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाइकांच्या उपस्थितीत वैदिक पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. मंडपात लग्नविधी सुरू असतानाच मुलगी पळवून नेल्याचा राग मनात धरून मुलीकडील संतप्त नातेवाइकांनी अचानक लग्न मंडपात प्रवेश केला.

मंडपात घुसलेल्या संतप्त जमावाने लग्न सोहळ्यातील पाहुणे, लहान मुले आणि उपस्थित महिलांच्या अंगावर थेट डिझेल फेकण्यास सुरुवात केली आणि त्यांना आग लावून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या अंगावर काटा आणणाऱ्या प्रकारामुळे मंडपात एकच आरडाओरड आणि धावपळ उडाली. यानंतर संतापलेल्या दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी आणि राडा झाला.

घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी पोलीस ताफ्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली आणि जमावाला पांगवले. पोलिसांनी घटनास्थळावरून संशयित १० ते १२ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे येवला परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला असून शहरात शांतता आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande