मोर्शी, चांदूर रेल्वेत दारूचे अड्डे उद्ध्वस्त; ६.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावती, २६ ऑक्टोबर (हिं.स.) : अमरावती ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, मोर्शी आणि चांदूर रेल्वे परिसरात विषारी गावठी हातभट्टी दारू तयार करणारे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. ‘ऑपरेशन कवच’अंतर्गत करण
मोर्शी, चांदूर रेल्वेत विषारी हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त!


अमरावती, २६ ऑक्टोबर (हिं.स.) : अमरावती ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, मोर्शी आणि चांदूर रेल्वे परिसरात विषारी गावठी हातभट्टी दारू तयार करणारे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. ‘ऑपरेशन कवच’अंतर्गत करण्यात आलेल्या या दोन कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ६ लाख २ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवायांमुळे अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोडदेव परिसरातील शेतशिवारात छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली असता, तेथे हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा १ हजार ४०० लिटर मोहाचा सडवा, युरिया, तुरटी, प्लास्टिक ड्रम आणि इतर साहित्य आढळून आले. हा एकूण २ लाख ८० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांदूर रेल्वे परिसरातील दुसऱ्या कारवाईत गौरखेड येथे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी घटनास्थळी हातभट्टी सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तेथून सुमारे २ हजार लिटर गावठी दारू, ५ हजार लिटर मोहाचा सडवा, विषारी औषधे आणि दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ३ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईदरम्यान काही आरोपी पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.

पोलीस अधीक्षक निकेतन कदम आणि अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि चांदूर रेल्वे पोलिसांनी या कारवाया केल्या. जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. ‘ऑपरेशन कवच’अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवायांमुळे अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधातील पोलिसांच्या मोहिमेला वेग आला आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande