परभणी - शेतकऱ्याच्या पशुधनावर निर्दयी हल्ला; दोन जनावरे दगावली
परभणी, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। पूर्णा तालुक्यातील पांगरा–बरबडी शिवारात पशुधनावर झालेल्या अमानुष हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी वार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २५) समोर आली अ
परभणी - शेतकऱ्याच्या पशुधनावर निर्दयी हल्ला; दोन जनावरे दगावली


परभणी, 25 ऑक्टोबर (हिं.स.)।

पूर्णा तालुक्यातील पांगरा–बरबडी शिवारात पशुधनावर झालेल्या अमानुष हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी वार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २५) समोर आली असून, या हल्ल्यात दोन जनावरांचा मृत्यू झाला, तर अनेक गायी-म्हशी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या क्रूर घटनेमुळे पशुपालक, शेतकरी भयभीत झाले असून हल्लेखोरांचा तातडीने शोध घेण्याची मागणी होत आहे.

रविवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शेतकरी कुटुंबांना मोठा धक्का बसला. जनावरांच्या शरीरावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आल्याने जनावरे रक्तबंबाळ झाली. आपल्या उदरनिर्वाहाचा आधार असलेल्या पशुधनाची अशी अवस्था पाहून शेतकऱ्यांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जनावरे ही मोठी संपत्ती असते. या हल्ल्यात जनावरांचा मृत्यू झाल्याने आणि इतर जनावरे जखमी झाल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार नुकसान सुमारे दहा लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे. पशुधनावर अशा प्रकारे हल्ला करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा प्रकार कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला, याचा शोध घेणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांच्या सुरक्षेचा प्रश्नही या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित आरोपींना शोधून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांचे पंचनामे करून त्यांना शासकीय मदत मिळवून द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

मुक्या जनावरांवर झालेला हा हल्ला म्हणजे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवरच घाव! आता या प्रकरणाचा छडा कधी लागणार आणि दोषींवर कारवाई कधी होणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande