
नवी मुंबई, 25 ऑक्टोबर (हिं.स.)।
मुंबईच्या झवेरी बाजाराच्या पिढ्यान्पिढ्यांच्या वारशाला आता महापेच्या आधुनिक औद्योगिक क्षमतेची जोड मिळणार आहे. जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या पुढाकारातून महापे येथे इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई प्रकल्पाचा शुभारंभ झाला. या माध्यमातून महाराष्ट्राला केवळ ज्वेलरी व्यापाराचे नव्हे, तर उत्पादन, संशोधन, डिझाईन, कौशल्यविकास आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
महापेतील सुमारे २२ एकरांवर अत्याधुनिक ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग हब उभारला जाणार असून, दोन हजारांहून अधिक उत्पादन युनिट्सना सामावून घेण्याची क्षमता निर्माण होणार आहे. प्रकल्पातून सुमारे २५ हजार कोटींची गुंतवणूक आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मिळून सुमारे १ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
मुंबईच्या झवेरी बाजाराचा अनेक पिढ्यांचा मेहनत आणि विश्वासाचा इतिहास असून, भारत डायमंड बोर्समुळे मुंबईला जागतिक हिरे व्यापाराच्या नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. आता या पारंपरिक व्यापाराला आधुनिक उत्पादनाची जोड देत महाराष्ट्राला जागतिक ज्वेलरी हब बनवण्याचा प्रयत्न आहे.
उद्योगासाठी केवळ जमीन उपलब्ध करून देणे पुरेसे नसून वीज, पाणी, रस्ते, पायाभूत सुविधा आणि विविध परवानग्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही सरकारची आहे. या प्रकल्पासाठी सरकारने ‘रेड कार्पेट’ची भूमिका घेतली असून, महायुती सरकार हे ‘स्थगिती नव्हे, तर प्रगतीचे सरकार’ असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
जेम्स अँड ज्वेलरी उद्योग देशासाठी परकीय चलन आणि रोजगार निर्माण करणारा महत्त्वाचा क्षेत्र आहे. देशभरातील ५० लाखांहून अधिक कारागीर या उद्योगाशी जोडलेले असून, भारतातून दरवर्षी सुमारे अडीच लाख कोटी रुपयांच्या जेम्स अँड ज्वेलरीची निर्यात होत असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राचा या क्षेत्रातील वाटा मोठा असून राज्यातील निर्यात दुप्पट करण्याचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्राच्या जेम्स अँड ज्वेलरी धोरणातून १ लाख कोटी गुंतवणूक आणि ५ लाख रोजगारांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. AI, थ्री-डी डिझायनिंग, लॅब ग्रोन डायमंड आणि ऑनलाइन ट्रेडिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाला पारंपरिक कारागिरीची जोड देण्यावर भर दिला जाणार आहे. स्थानिक युवक-युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षण आणि कामगारांच्या निवासाचीही व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे.
“सोने तिजोरीत ठेवले तर संपत्ती साठते; पण सोने उद्योगात गुंतले तर रोजगार निर्माण होतो, अर्थव्यवस्था वाढते आणि देश समृद्ध होतो,” असे शिंदे म्हणाले. विकसित भारताच्या संकल्पनेत उत्पादन, निर्यात, रोजगार आणि उद्योजकतेची भूमिका महत्त्वाची असून, महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने नेण्यात अशा उद्योगांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे पदाधिकारी, चेअरमन किरीट भन्साळी, प्रधान सचिव उद्योग डॉ. अनबलगन, जिल्हाधिकारी कृष्णा पांचाळ, आयुक्त कैलास शिंदे, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह या क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर