परिसंवादाने नाही; प्रत्यक्ष काम केल्याने जनजातींचे प्रश्न सुटतील - भैय्याजी जोशी
पुणे, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। “वनवासींच्या प्रश्नांविषयी केवळ चिंता किंवा वेदना व्यक्त करून चालणार नाही. तसेच, केवळ परिसंवाद आयोजित करून हे प्रश्न सुटत नाहीत; तर त्यांच्या समस्या समजून घेऊन प्रत्यक्ष जंगल क्षेत्रात पाय रोवून उभे राहणे गरजेचे आहे. राष
Mfg


पुणे, 25 ऑक्टोबर (हिं.स.)।

“वनवासींच्या प्रश्नांविषयी केवळ चिंता किंवा वेदना व्यक्त करून चालणार नाही. तसेच, केवळ परिसंवाद आयोजित करून हे प्रश्न सुटत नाहीत; तर त्यांच्या समस्या समजून घेऊन प्रत्यक्ष जंगल क्षेत्रात पाय रोवून उभे राहणे गरजेचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी गेली कित्येक वर्षे हेच धोरण अंगीकारल्यामुळे आज वनवासी जीवनात मोठ्या प्रमाणावर सकारात्मक परिवर्तन दिसत आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले.

एस. पी. कॉलेज येथील लेडी रमाबाई सभागृहात छत्तीसगडमधील बारसुर येथील ‘बनफूल’ संस्थेच्या वतीने आयोजित ‘बस्तरची शोधयात्रा’ या माहितीपटाचे अनावरण भैय्याजी जोशी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या प्रसंगी पद्मश्री दादा लाड, पद्मश्री सुनीता गोडबोले, डॉ. राम गोडबोले आणि पद्मश्री डॉ. बुधरी ताती हे व्यासपीठावर उपस्थित होते.

आणीबाणीनंतर वनवासी क्षेत्रात योजनापूर्वक काम करण्याचा निर्णय संघाकडून घेण्यात आला, असे सांगत भैय्याजी जोशी म्हणाले, “दुर्दैवाने समाजात काही चुकीच्या धारणा प्रस्थापित केल्या गेल्यामुळे मोठी दरी निर्माण झाली. इंग्रजांच्या कालखंडात ‘आदिवासी’ हा शब्द योजनापूर्वक आणला गेला आणि जनजाती समाजाला इतरांपासून वेगळे भासवले गेले.”

शहरी संस्कृतीचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले, “शहरी जीवनाच्या फुटपट्ट्यांच्या निकषांवर वनवासी क्षेत्रातील समस्या कधीही समजून घेता येणार नाहीत. अज्ञान आणि गरिबीमुळे समाजात मागासलेपण आले असून, त्यामुळे त्यांना विकासाची परिभाषा समजत नाही. अशा वेळी जनजाती समाजातील उपजत प्रतिभा आणि क्षमतांना बळ देण्याची खरी गरज आहे.”

- कल्याण आश्रमाच्या कार्यामुळे विश्वासाचे स्थान

वनवासी समाजाच्या प्रश्नांवर भाष्य करताना जोशी म्हणाले, “अज्ञानामुळे वनवासी समाजातील लोकांना आपले काही प्रश्न आहेत, याची जाणीवच नसते; त्यामुळे प्रश्न सोडवण्याचा विषयच येत नाही. मात्र, जनजाती कल्याण आश्रमाने जनजाती समाजाचे प्रश्न तळमळीने समजून घेणारे शेकडो कार्यकर्ते उभे केले. त्यांनी समाजात विश्वासाचे स्थान निर्माण केले. आसाम असो वा बस्तर, संघ व सेवाकार्यामुळे आज एकात्मतेचे सुंदर दृश्य पाहायला मिळत आहे. आता शासनाच्या कठोर भूमिकेमुळे आणि संवेदनशील सरकारमुळे बस्तरमधील नक्षलवाद व भ्रष्टाचाराचे सावट दूर होऊन प्रश्न सुटण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे,” असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

- बस्तरच्या वेदना आणि ३५ वर्षांचे अस्वस्थ वास्तव

डॉ. राम गोडबोले यांनी बस्तरच्या गेल्या तीन दशकांतील संघर्षावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “भास्करराव कळंबी यांनी आम्हाला बस्तरला जाण्यासाठी प्रेरित केले. वर्षानुवर्षे राजेशाही आणि इंग्रजांविरुद्ध लढलेला बस्तरचा प्रदेश आणि अबुजमाडचा परिसर कायम दुर्लक्षित राहिला. गेल्या ३५ वर्षांत बस्तर अशांत राहिले असून, नक्षलवादामुळे १२ हजार जनजाती बांधव मारले गेले, तर ६५ हजार वनवासींना स्थलांतर करावे लागले.”

“जनजाती समाज कधीही कोणाकडे याचना करत नाही, तो धैर्याने लढायला तयार आहे. आज ‘बनफूल’ संस्था, ज्ञान प्रबोधिनी आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने मदतीचा हात पुढे केला आहे. या स्थित्यंतरात युवकांनी बस्तरच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे,” असे आवाहनही डॉ. गोडबोले यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande