
लातूर, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। निलंगा शहरातील बँक कॉलनी परिसरात सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत १३ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, ११ लाख २ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकींचा समावेश आहे.
नांदेड परिक्षेत्रांतर्गत लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसाय सुरू असल्याबाबतच्या तक्रारी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने त्यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक लातूर जिल्ह्यात कारवाईसाठी रवाना केले होते.
या पथकाने २५ ऑक्टोबर रोजी निलंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बँक कॉलनी येथे विठ्ठल वाघमोडे यांच्या पत्र्याच्या शेडसमोर सुरू असलेल्या तिर्रट जुगारावर छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्या १३ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून ४३ हजार ६५० रुपये रोख, १३ मोबाईल आणि १० मोटारसायकली असा एकूण ११ लाख २ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७८/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस हवालदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या या कारवाईबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले.
अवैध व्यवसायांची माहिती ‘खबर’ हेल्पलाइनवर द्या
नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवता यावी, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय, नांदेड परिक्षेत्राच्या वतीने ‘खबर’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. यासाठी ९१५०१००१०० हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांबाबतची माहिती या हेल्पलाइनद्वारे पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन शहाजी उमाप यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis